Pimpri : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष उद्यापासून सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष उद्या (बुधवार) पासून सुरु होणार आहे. हे नियंत्रण कक्ष कार्यालय जुने वाकड पोलीस स्टेशनच्या इमारतीत सुरु होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले आहे. त्यामुळे प्रशासनातील प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे सुरु करण्यासाठी आयुक्तालयाची धावपळ सुरु आहे. पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्ष उदघाटनाच्या दिवशी (दि. 15 ऑगस्ट) सुरु झाले. परंतु या एकाच नियंत्रण कक्षावर संपूर्ण वाहतूक आणि अन्य असा संपूर्ण भार येत होता. त्यामुळे वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष लवकरात लवकर सुरु करणे ही आयुक्तालयाची प्राथमिकता होती. त्यानुसार आयुक्तालयाच्या उदघाटनानंतर पंधरा दिवसाच्या आतमध्ये वाकड येथे वाहतूक विभागाचे नियंत्रण कक्ष सुरु होत आहे.

नियंत्रण कक्षासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज (मंगळवारी) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात घेण्यात आल्या. त्यानुसार नियंत्रण कक्षासाठी मनुष्यबळ कमी पडू नये, असा मानस आयुक्तालयाने ठेवला आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता अद्याप झाली नसून लवकरात लवकर संपूर्ण स्वतंत्र संच उभारण्यासाठी पोलीस प्रशासन तत्पर असल्याचे पोलीस उप आयुक्त विनायक ढाकणे यांनी सांगितले. वाहतूक नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक अद्याप ठरले नाहीत. उद्या (बुधवारी) वाहतूक विभाग नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात येणार असल्याचेही उप आयुक्त म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.