NCRB Report News : भारतात 2020 मध्ये दररोज सरासरी 80 खून, 77 बलात्कार – NCRB अहवाल

एमपीसी न्यूज – नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) 2020 मध्ये नोंदवल्या गेलेल्या गुन्ह्यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली असून 2019 च्या तुलनेत 2020 च्या आकडेवारीत 1 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

2020 मध्ये भारतात दररोज सरासरी 80 खून आणि 77 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. भारतात एकूण 29 हजार 193 जणांच्या हत्या झाल्या असून, हत्येच्या सर्वाधिक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडल्याचे ही आकडेवारी सांगते.

उत्तर प्रदेशमध्ये हत्येच्या सर्वाधिक 3 हजार 779 घटनांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल बिहारमध्ये 3 हजार 150 घटना, तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र असून राज्यात 2 हजार 163 हत्या झाल्या आहेत. तर, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये 1 हजार 948  खुनाचे गुन्हे दाखल झाले. तसेच 2020 मध्ये राजधानी दिल्लीत 472 खून झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

2019 च्या तुलनेत 2020 मध्ये महिलांविरोधात गुन्ह्यांमध्ये 8.3 टक्क्यांनी घट झाली आहे. 2020 मध्ये राजस्थानमध्ये सर्वाधिक 5 हजार 310 बलात्काराच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 2 हजार 769, मध्यप्रदेश 2 हजार 339, महाराष्ट्रात 2 हजार 061 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

2020 मध्ये सर्वत्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तरीही देशातील गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली असता लॉकडाऊनमध्ये देखील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत नाही. खून आणि बलात्काराच्या घटनेत महाराष्ट्र अनुक्रमे तिस-या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. सविस्तर अहवाल नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) ncrb.gov.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.