एमपीसी न्यूज – भारत सरकारने चीन संबंधित कंपन्यांवर दुसऱ्यांदा मोठी कारवाई केली आहे. सुरवातीला 59 चिनी अ‍ॅप्स बॅन केल्यानंतर भारत सरकारने अजून 47 चिनी अ‍ॅप्स बॅन केले आहेत. नव्याने बॅन करण्यात आलेल्या या अ‍ॅप्समध्ये बहुतांश ‘क्लोनिंग’ अ‍ॅपचा समावेश आहे.

दरम्यान, बॅन केलेले क्लोनिंग अ‍ॅप्स हे अगोदर बॅन केलेल्या अ‍ॅपसाठी पर्याय म्हणून बाजारात उतरवण्यात आले होते. युजरची खासगी माहितीची चोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका यांच्या आधारे भारत सरकारने ही मोबाईल ॲप्लिकेशन बॅन केली आहेत.

बंद करण्यात आलेल्या या अप्लिकेशन्स मध्ये टिक टॉक लाईट, हॅलो लाईट, शेअर इट लाईट,बिगो लाईव्ह लाईट यासारख्या अप्लिकेशन्सचा समावेश आहे.

भारत-चीन सीमेवर संघर्षादरम्यान भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली होती.   गेल्या महिन्यात वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे 59 चिनी अ‍ॅप्सवर भारताने बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉक, कॅमस्कॅनर, शेअरइट अशा अनेक लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश होता.