India Boycott Chinese Products : चिनी वस्तूंवर 71 टक्के भारतीयांचा बहिष्कार, चीनला 40 हजार कोटींचा फटका

एमपीसी न्यूज – गलवान खो-यात भारतीय सैनिकांशी झटापट झाल्यानंतर भारताने चीनवर डिजिटल सर्जिकल स्ट्राईक करत चिनी मोबाईल अप्लिकेशनवर बंदी घातली. त्यानंतर भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा सूर देशात उठू लागला त्याचाच फटका चीनला या दिवाळीत बसला. ‘लोकल सर्कल’च्या सर्व्हेनुसार 71 टक्के भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला.

या सर्व्हेनुसार ‘मेड इन चायना’ वस्तूंना भारतीयांनी यावेळी नकार दिला. मागील तीन महिन्यांपासून भारतीयांनी चिनी वस्तूंची खरेदी न करण्याचा निर्धार केला आणि तो पूर्ण केल्याचे या सर्व्हेत दिसून आले आहे. समाज माध्यमांवर केलेल्या सर्वेक्षणात 204 जिल्ह्यांमधील 14 हजार ग्राहकांनी आपल्या खरेदीबाबत मते मांडली. ज्यात 71 टक्के ग्राहकांनी चिनी वस्तूंची खरेदी टाळली. तर केवळ 29 टक्के ग्राहकांनी एक किंवा दोन चिनी वस्तू खरेदी केल्या असल्याचे समोर आले आहे. त्या 29 टक्क्यांमधील 11 टक्के ग्राहक चीनबाबत अनिभिज्ञ होते. तर 16 टक्के ग्राहकांना माहिती असून देखील चिनी वस्तू खरेदी केल्याचे समोर आले आहे.

व्यावसायिकांची राष्ट्रीय पातळीवरील संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या अंदाजानुसार भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्याने चीनला किमान 40 हजार कोटींचा फटका बसला आहे. व्यावसायिकांनी चीन मालाची आयात कमी करण्याचा निश्चय केला आहे. येत्या जानेवारीपासून याची कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे संघटनेने म्हटलं आहे.

चिनी मालाची भारतीय बाजारपेठेवर मजबूत पकड होती. विद्युत उपकरणे, स्मार्टफोन, शोभेच्या आणि सजावटीच्या वस्तू, खेळणी यासारख्या छोट्या आणि तुलनेने स्वस्त वस्तूंची भारतीय सणासुदीला जोरदार खरेदी करायचे. देशी मालाच्या तुलनेत स्वस्त असल्याने चिनी मालाला प्रचंड मागणी होती. यंदा मात्र ग्राहकांनीच पण केल्याने चिनी मालाची विक्री ठप्प झाल्याचे दिसून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.