India-China Border : शहीद जवानांचे शौर्य आणि त्याग कधी विसरणार नाही- राजनाथ सिंह

The bravery and sacrifice of the martyred soldiers will never be forgotten - Rajnath Singh

एमपीसी न्यूज – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (बुधवारी) सकाळी साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली येथे एक बैठक घेतली. या बैठकीसाठी संरक्षण दल प्रमुख, सेना दल प्रमुख उपस्थित होते. संरक्षण मंत्र्यांनी या बैठकीत लडाख सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ट्विट करून शहीद जवानांचे शौर्य आणि त्याग कधी विसरणार नाही, अशा शब्दांत सीमेवरील संघर्षात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले.

बैठकीसाठी संरक्षण दलांचे प्रमुख आणि लष्करी कामकाज विभागाचे सचिव जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे, नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया उपस्थित होते.

राजनाथ सिंह यांनी एका ट्विटद्वारे दिलेल्या संदेशात सीमेवरील संघर्षात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

राजनाथ सिंह म्हणाले, “गलवानमध्ये सैनिक शहीद होणे, हे फारच क्लेशदायक आणि वेदनादायक आहे. आपल्या सैनिकांनी कर्तव्य बजावताना अतुलनीय शौर्य व पराक्रम दाखवला आणि भारतीय सैन्याच्या सर्वोच्च परंपरेत आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

राष्ट्र त्यांचे शौर्य आणि त्याग कधी विसरणार नाही. शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या कठीण काळात राष्ट्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

आम्हाला भारताच्या शूरवीरांच्या शौर्य आणि धैर्याचा अभिमान आहे, असेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.