India-China Crisis: दबावापुढे चीन झुकला, गलवान खोऱ्यातून 1.5 किलोमीटर सैन्य मागे

India-China Crisis: china has pull back 1.5 km its troops from galwan valley सैन्य दलातील सू्त्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिनी सैनिकांनी आपले कॅम्पही मागे घेतले आहेत.

एमपीसी न्यूज- लडाखमधील भारताचे आक्रमक धोरण आणि चोख प्रत्युत्तरामुळे चीनने अखेर नरमाई दाखवली आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनदरम्यान सुरु असलेल्या तणावादरम्यान पेइचिंग झुकले असून गलवान खोऱ्यात चकमक झालेल्या ठिकाणापासून 1.5 किलोमीटर आपले सैन्य मागे घेतले आहे. दरम्यान, दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी कमांडर स्तरावरील अनेक बैठका पार पडल्या होत्या.

तणाव निवळण्यासाठीचे हे पहिले पाऊल असल्याचे जाणकार सांगत आहेत. दि. 15 जून रोजी रात्री दोन्ही देशातील जवानांमध्ये चकमक उडाली होती. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचे 40 सैनिक मारले गेले होते.

लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैनिक डिसएंग्जमेंट प्रक्रिये अंतर्गत सुमारे 1.5 किलोमीटर मागे गेले आहेत. सैन्य दलातील सू्त्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिनी सैनिकांनी आपले कॅम्पही मागे घेतले आहेत. परंतु, यावर अद्याप सैन्य दलाचे अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) दोन्ही देशांच्या सैन्याने रिलोकेशनवर सहमती दर्शवली होती. पुन्हा हिंसक घटना होऊ नये यासाठी गलवान खोऱ्याला आता बफर झोन बनवण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सत्यता पडताळण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. परंतु, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सैनिक मागे गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण ते किती मागे गेले आहेत, हे तपासून पाहिल्यानंतरच निश्चित होईल. 30 जून रोजी कोअर कमांडर स्तरावर झालेल्या बैठकीत सत्यता पडताळण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली होती.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चीनने एक तंबू हटवला तर तीन दिवसाच्या आत यूएव्हीने छायाचित्र काढले जाईल आणि पुन्हा पेट्रोलिंग पार्टी जाऊन प्रत्यक्षात पडताळून पाहेल. जेव्हा पडताळणी होईल, त्यानंतरच पुढचे पाऊल उचलले जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.