India Corona Update : ‘ओमिक्रॉन’ भारतासाठी गंभीर इशारा, गेल्या 24 तासांत 8,774 नवे कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या विषाणूमुळे जगभरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर चिंता वाढली आहे. कारण हा नविन विषाणू डेल्टा प्लस पेक्षा ही भयंकर असल्याची चिंता तज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी देखील ‘ओमिक्रॉन’ भारतासाठी गंभीर इशारा असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे भारतात गेल्या 24 तासांत 8 हजार 774 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 45 लाख 72 हजार 523 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 39 लाख 98 हजार 2780 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 481 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.34 टक्के एवढा झाला आहे.

देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत घट होत असून, सध्या 1 लाख 05 हजार 691 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात गेल्या 24 तासांत 621 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 68 हजार 554 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.36 टक्के एवढा झाला आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 121 कोटी 94 लाख 71 हजार 134 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 82 लाख 86 हजार 058 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉनला ‘चिंतेचा प्रकार’ म्हणून संबोधले आहे. हा कोविडच्या मागील प्रकारापेक्षा जास्त संसर्गजन्य असू शकतो. मात्र, तज्ञांना अद्याप ओमिक्रॉनच्या गंभीरतेचे स्वरुप स्पष्ट झाले नाही. यावर संशोधन सुरु आहे. मात्र, यापुर्वीची परिस्थिती पाहता खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.