एमपीसी न्यूज – तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गेल्या 24 तासांत देशभरात मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 2 हजार 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकट्या मध्य प्रदेश राज्यात 1 हजार 481 रुग्ण दगावल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेश राज्याने मागील कोरोना मृतांची संख्या अद्ययावत केल्याने मृतांची संख्या वाढल्याचे सरकारने म्हटले आहे.

दुसरीकडे देशात मागील चार महिन्यांतील निच्चांकी रुग्णवाढ नोंदवली आहे. गेल्या 24 तासांत देशात 31 हजार 443 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 09 लाख 05 हजार 819 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 63 हजार 720 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. 49 हजार 009 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली सध्या 4 लाख 31 हजार 315 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात आजवर 4 लाख 10 हजार 784 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा आहे. तर, रिकव्हरी रेट 97.28 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 43 कोटी 40 लाख 58 हजार 138 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 17 लाख 40 हजार 325 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 38 कोटी 14 लाख 67 हजार 646 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 40 लाख 65 हजार 862 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.