India Corona Update: देशातील सव्वालाख पैकी 52 हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात, मृत्यूदरही तीन टक्क्यांहून कमी

India Corona Update: 52 thousand out of 1.25 lakh patients in the country overcome corona, death rate less than 3%

0

एमपीसी न्यूज – भारतात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत तब्बल 6,654 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशात कोरोना संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या एक लाख 25 हजार 101 पर्यंत पोहचली आहे. त्याच बरोबर आतापर्यंत 51 हजार 784 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. देशातील कोरोनामुक्तांचे प्रमाण 41.39 पर्यंत वाढले आहे. कोरोनाबाधित मृतांची संख्या 3,720 पर्यंत पोहचली असली तर मृतांची टक्केवारी तीन टक्क्यांपेक्षाही कमी झाली आहे.

देशातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच बरोबर उपचारांनी बरे होऊन रुग्णालयातून घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. मृत्यूदर मर्यादित ठेवण्यात भारताला यश आलेले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या सव्वालाखांच्या पुढे गेल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात 69 हजार 597 इतके सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

एकूण चाचण्यांपैकी 95.69 टक्के चाचण्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह 

देशात आतापर्यंत 28 लाख 34 हजार 798 कोरोना चाचण्या झाल्या असून त्यापैकी 1 लाख 25 हजार 101 चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. भारतात सरसकट कोरोना चाचण्या केल्या जात नाही. संशयित रुग्ण आणि पॉझिटीव्ह रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींच्याच चाचण्या केल्या जात आहे. तरी देखील 95.69 टक्के चाचण्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह येत आहेत, यावरून भारतातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.  केलेल्या चाचण्यांपैकी केवळ 4.41 टक्के चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. त्यामुळे देशवासीयांनी घाबरून जाण्यासारखी परिस्थिती अजिबात नाही.

देशात गेल्या 24 तासांत बऱ्या झालेल्या 3 हजार 720 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे देशातील आतापर्यंतच्या कोरोनामुक्तांची एकूण संख्या 51 हजार 784 झाली आहे. हे प्रमाण वाढत-वाढत 41.39 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे, ही फार मोठी दिलासादायक बाब आहे.

मृत्यूदर 2.97 पर्यंत खाली 

देशात गेल्या 24 तासांत 137 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोना बळींचा आकडा 3,720 वर पोहचला आहे. भारतात सुरूवातीपासूनच कोरोनाचा मृत्यूदर 3.4 इतका मर्यादित होता. तो आणखी कमी होत आता तीन टक्क्यांच्याही खाली आला आहे. भारतातील कोरोनाचा मृत्यूदर 2.97 टक्के इतका झाला आहे.

देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांपैकी 41.39 टक्के रुग्ण बरे झाले तर 2.97 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता सक्रिय रुग्णांची टक्केवारी 55.64 टक्के झाली आहे. देशात 69 हजार 597 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी घाबरून न जाता, शासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like