India Corona Update: देशात 24 तासांत 68,898 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 29 लाखांवर

India Corona Update: 68,898 new patients in 24 hours in the country, the number of infected 29 million देशभरात आजवर तब्बल 3 कोटी 34 लाख 67 हजार 237 नमुने तपासण्यात आले आहेत.

एमपीसी न्यूज – भारतात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या चिंताजनक ठरत आहे. देशात मागील 24 तासांत 68 हजार 898 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 29 लाखांवर पोहोचली आहे.

मागील 24 तासांत झालेल्या रुग्ण वाढीसह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 29 लाख 05 हजार 824 इतकी झाली आहे. त्यापैकी सध्या 6 लाख 92 हजार 028 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशातील एकूण 21 लाख 58 हजार 947 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशभरात मागील 24 तासांत 983 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना मुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या 54 हजार 849 एवढी झाली आहे. देशातील मृत्यूची टक्केवारी कमी झाली असून ती सध्या 1.89 टक्के आहे.

भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मागील 24 तासांत देशभरात 62 हजार 282 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 74.43 टक्के झाली आहे.

आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात आजवर तब्बल 3 कोटी 34 लाख 67 हजार 237 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी, 8 लाख 05 हजार 985 चाचण्या या गुरुवारी (दि.21) रोजी करण्यात आल्या आहेत. देशात मागील काही दिवसांपासून 7 ते 8 लाखांच्या जवळपास चाचण्या केल्या जात आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात तीन वेगवेगळ्या लसीच्या चाचणी सुरू आहेत. त्यापैकी एक सध्या तिसऱ्या व अंतिम टप्प्यात आहे. तर, इतर दोन या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.