India Corona Update : 75 कोटी लोकांनी घेतली लस, चोवीस तासांत 25,404 नवे कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम वेगाने सुरू असून देशात 75 कोटी लोकांनी लसीचा किमान पहिला डोस घेतला आहे. दुसरीकडे देशात सलग तिसऱ्या दिवशी तीस हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 25 हजार 404 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 32 लाख 89 हजार 579 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 24 लाख 84 हजार 159 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 37 हजार 127 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशात सध्या 3 लाख 62 हजार 207 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात आजवर 4 लाख 42 हजार 213 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा झाला असून, देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.58 टक्के एवढा आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 54 कोटी 44 लाख 44 हजार 967 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 14 लाख 30 हजार 891 नमूने तपासण्यात आले आहेत.

75 कोटी नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. आत्तापर्यंत देशात 75 कोटी 22 लाख 38 हजार 324 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 78 लाख 66 हजार 950 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.