India Corona Update : कोरोना कहर सुरूच ! गेल्या 24 तासांत 78,357 नवे रुग्ण, 1045 मृत्यू

देशात मागील तीन दिवसांपासून 10 लाखांहून अधिक चाचण्या करण्यात येत आहेत. चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांचे प्रमाण देखील वाढल्याचे सांगितले जात आहे.

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्ण वाढीचा दर काही केल्या कमी होत नसून दररोज विक्रमी रुग्णांची नोंद होत आहे. देशभरात मागील 24 तासांत 78 हजार 357 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून 1,045 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दररोज रुग्णांची होणारी विक्रमी वाढ प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे.

देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 37 लाख 69 हजार 524 एवढी झाली आहे. यापैकी सध्या 8 लाख 01 हजार 282 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर तब्बल 29 लाख 01 हजार 909 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

मागील 24 तासांत झालेल्या 1,045 रूग्णांच्या मृत्यूसह देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या 66 हजार 333 एवढी झाली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून गेल्या 24 तासांत 62 हजार 026 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 76.94 टक्के आहे तर, मृत्यूदर 1.8 टक्के आहे.

देशात मागील तीन दिवसांपासून 10 लाखांहून अधिक चाचण्या करण्यात येत आहेत. चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांचे प्रमाण देखील वाढल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी देशात 10 लाख 12 हजार 367 नमुने तपासण्यात आले. देशात आजवर तब्बल 4 कोटी 43 लाख 37 हजार 201 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार देशात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोना बाधा झाल्याचे प्रमाण 54 टक्के आहे. तसेच कोरोनामुळे झालेल्या मृत्यू मध्ये 51 टक्के मृत्यू हे 60 व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे आहेत. सतरा वर्षे वयाच्या खालील किशोर वयातील मुलांना कोरोना बाधा होण्याचे प्रमाण 8 टक्के आहे तर, मृत्यूचे प्रमाण एक टक्का आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.