India Corona Update : देशात 24 तासांत 81,484 रुग्ण 1,095 मृत्यू, मृतांची संख्या 1 लाखांच्या उंबरठ्यावर

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायचं नावच घेताना दिसत नाही. मागील 24 तासांत देशभरात 81 हजार 484 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 1,095 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे देशात कोरोनामुळे दगावलेल्या मृतांची संख्या एक लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 63 लाख 94 हजार 069 इतकी झाली असून सध्या 9 लाख 42 हजार 217 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे एकूण बाधित रुग्णांपैकी 53 लाख 52 हजार 078 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात मागील 24 तासांत 78 हजार 877 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याची देशाची टक्केवारी 83.70 टक्के एवढी झाली आहे.

देशात दररोज एक हजाराहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होतो आहे. मागील 24 तासांत देशभरात 1,095 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशात कोरोनामुळे दगावलेल्या मृतांची संख्या एक लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.56 टक्के एवढा आहे.

आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांत 10 लाख 97 हजार 947 एवढ्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशभरात आत्तापर्यंत एकूण 7 कोटी 67 लाख 17 हजार 728 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यात देशातील सर्वाधिक रुग्णांची वाढ होत आहे. देशातील नव्यानं वाढ झालेल्या रुग्णांपैकी 76 टक्के रुग्ण हे फक्त दहा राज्यातील आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.