India Corona Update : 86 लाख रुग्ण कोरोनामुक्त, 24 तासांत 42,314 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मागील 24 तासांत देशभरात 42 हजार 314 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 86 लाख रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असून ते 93.75 टक्के एवढे आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 37 हजार 975 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 91 लाख 77 हजार 841 एवढी झाली आहे. त्यापैकी 86 लाख 04 हजार 955 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 4 लाख 38 हजार 667 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांत झालेली रुग्णांची वाढ सोमवारी झालेल्या रुग्णवाढीपेक्षा कमी आहे. सोमवारी 44 हजार 059 रुग्णांची वाढ झाली होती. देशात मागील 24 तासांत 480 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1 लाख 34 हजार 218 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशातील कोरोना मृत्यूदर 1.46 टक्के एवढा आहे. भारताचा मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत कमी आहे.

आतापर्यंत देशभरात 13 कोटी 36 लाख 82 हजार 275 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाख 99 हजार 545 नमूने सोमवारी (दि.23) तपासण्यात आले आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाची‌ बहुप्रतिक्षित ‘कोव्हीशिल्ड’ ही लस 70.4 टक्के परिणामकारक असल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे. कोरोना लशीच्या चाचणीत 20 हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते. ज्या स्वयंसेवकांना लशीचे दोन डोस देण्यात आले होते, त्यांपैकी 30 जणांमध्ये कोरोनाची लक्षणं पहायला मिळाली, तर ज्यांना डमी इंजेक्शन दिले होते, त्यांपैकी 101 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. ही लस 70.4 टक्के सुरक्षित असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

‘कोव्हीशिल्ड’ या लशीचे दोन ‘हाय डोस’ जेव्हा स्वयंसेवकांना देण्यात आले, तेव्हा कोरोनापासून संरक्षण मिळण्याचं प्रमाण 62 टक्के होतं. ज्यांना या लशीचा एक लो डोस आणि नंतर एक हाय डोस देण्यात आला, तेव्हा मात्र कोरोनापासून संरक्षणाचं प्रमाण हे 90 टक्के एवढं झालं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.