India Corona Update: देशात गेल्या 24 तासांत 88,600 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 60 लाखांच्या उंबरठ्यावर

एमपीसी न्यूज – देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 60 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. मागील 24 तासांत देशभरात 88 हजार 600 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत देशभरात 1,124 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 59 लाख 92 हजार 533 एवढी झाली आहे. त्यापैकी 9 लाख 56 हजार 402 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 49 लाख 41 हजार 628 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 82.14 टक्यावर पोहचला आहे.

मागील 24 तासांत देशभरात 1,124 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजवर 94 हजार 503 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. देशाचा मुत्यूदर 1.58 टक्के एवढा आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून मागील 24 तासांत देशभरात 92 हजार 043 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात आत्तापर्यंत 7 कोटी 12 लाख 57 हजार 836 नमूणे तपासण्यात आले आहेत त्यापैकी 9 लाख 87 हजार 861 चाचण्या या शनिवारी (दि.26) करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात सध्या 110 पीपीई किट उत्पादक असून ते सध्या दिवसाला पाच लाख पीपीई किटची निर्मिती करत आहेत. त्यामुळे आता राज्यांना पीपीई किटची कमतरता भासणार नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन सिंग यांनी सांगितले आहे. देशात सध्या 1,823 प्रयोगशाळा असून त्यापैकी 1,086 सरकारी तर 737 खासगी प्रयोगशाळा आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.