India Corona Update : धक्कादायक ! जुलै महिन्यात 11.1 लाख रुग्णांची वाढ, गेल्या 24 तासांत 57,117 नवे रुग्ण

एकूण रुग्ण संख्या 17 लाखांच्या उंबरठ्यावर

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना कहर सुरूच असून फक्त जुलै महिन्यात तब्बल 11.1 लाख रुग्णांची वाढ झाली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी 55 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 57,117 नवे रुग्णांची नोंद झाली आहे तर, 764 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 17 लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 16,95,988 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 5,65,103 सक्रिय रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून आजपर्यंत जवळपास 10,94,374 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 764 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा 36,511 वर जाऊन पोहोचला आहे.

देशात आजवर तब्बल 1,93,58,659 एवढ्या नमूण्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5,25,689 चाचण्या या शुक्रवारी (दि.31) रोजी करण्यात आल्या आहेत. आयसीएमआर ने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

चिंताजनक बाब म्हणजे, फक्त जुलै महिन्यात भारतामध्ये 11.1 लाख करोनाबाधित रुग्ण आढळले असून 19,122 जणांना कोरोनामुळे  मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यात प्रत्येक दिवसाला 600 पेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच जुलै महिन्यात प्रत्येक तासाला सरासरी 25 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे दिसून आले आहे.

देशातील कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी गठित केलेल्या समितीची एकोणिसावी बैठक संपल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन सिंग प्रसारमाध्यमांशी बोलताना असे म्हणाले की, देशातील दहा लाखांहून अधिक रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत ही दिलासादायक बाब असून सरकारने केलेल्या योग्य नियोजन नियोजनाचे हे फळ आहे. तसेच, भारतात वैक्सिन निर्मितीची मोठी क्षमता असून येणाऱ्या काही महिन्यात आपण कोरोनावर संपूर्ण नियंत्रण मिळवू अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.