India Corona Update : कोरोना संसर्गाचा वेग मंदावतोय ; गेल्या 24 तासांत 61,267 नवे रुग्ण, 884 मृत्यू

एमपीसी न्यूज – देशात गेल्या दोन दिवसांपासून दररोज होणारी कोरोना रुग्णांची वाढ कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 61 हजार 267 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 884 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 66 लाख 85 हजार 083 वर पोहचली आहे. तर, देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येने 1 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण 66 लाख 85 हजार 083 कोरोनाबाधितांमध्ये 9 लाख 19 हजार 23 सक्रिय रुग्ण आहेत तर, डिस्चार्ज मिळालेले 56 लाख 62 हजार 491 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 लाख 3 हजार 569 जणांचा समावेश आहे.

देशात पाच ऑक्टोबर पर्यंत 8 कोटी 10 लाख 71 हजार 797 नमूने तपासण्यात आले आहेत. यातील 10 लाख 89 हजार 403 नमूने सोमवारी (दि.5) तपासले गेले. आयसीएमआरने याबाबत माहिती दिली आहे.

मागील 24 तासांत देशभरात 75 हजार 787 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 84.70 एवढा झाला असून मृत्यूदर 1.54 टक्के एवढा झाला आहे.

जगातील दहा पैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. जगात आत्तापर्यंत जवळपास 3.5 कोटी लोकांना संक्रमण झाले आहे मात्र हि संख्या 80 कोटींच्या घरात असू शकते असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला आहे. जगातील जवळपास सर्वच देशांत कोरोना पोहचला आहे मात्र 70 टक्के कोरोना रुग्ण व मृत्यू हे दहा देशात आढळले असून उरलेले फक्त तीन देशातील आहेत, असं आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.