एमपीसी न्यूज – देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांतही 37 हजार 140 नवीन रुग्ण सापडले.याआधी सोमवारी तब्बल 40 हजार नवीन रुग्ण सापडले होते. 24 तासांत 587 रुग्णांचा मृत्यू झाला, यासह देशातील एकूण मृतांचा आकडा 28 हजार पार झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात दिवसागणिक 35-40 हजार नवीन रुग्ण सापडताना दिसत आहेत. देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 11 लाख 55 हजार 151 झाली आहे. सध्या देशात 4 लाख 2 हजार 529 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 28 हजार 084 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे 7 लाख 24 हजार 577 रुग्ण निरोगीही झाले आहेत.

 

देशात आजवर 1,43,81,303 नमूण्यांची चाचणी करण्यात आली आहे. पैकी 3,33,395 चाचण्या मागील 24 तासांत पूर्ण झाल्या आहेत.

 

कोरोनाची रुग्ण संख्या वाढण्यामागे चाचण्या हे सुद्धा एक कारण आहे. देशभरात चाचण्यांचा वेग वाढवल्यामुळे कोरोना बाधित सापडण्याचे प्रमाणही वाढत आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.

कोरोनाचे सर्वात जास्त सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. सोमवारी राज्यात कोरोनाचे 8240 नवे रुग्ण सापडले. तर, 176 जणांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 18 हजार 695 झाली आहे. तर, 1 लाख 75 हजार 029 रुग्ण निरोगी झाले आहेत. मुंबईत एकाच दिवसात 1043 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णंची संख्या 1 लाखांपेक्षा जास्त आहेत.

देशातील एकूण रुग्णांपेक्षा 1.23 लाख रुग्ण एकट्या दिल्लीत आहे. दिल्ली सर्वात जास्त रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये तिसऱ्या तर मृतांच्या आकडेवारीत दुसऱ्या स्थानावर आहेत.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना लस सुरक्षित असल्याचं आणि शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीला कोरोनाविरोधात लढायला सज्ज करत असल्याचं स्पष्ट समोर आले आहे.