एमपीसी न्यूज – देशाने चार कोटी विक्रमी चाचण्यांचा टप्पा गाठला आहे. ऑगस्ट महिन्यात चाचण्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. ऑगस्टमध्ये तब्बल दोन कोटी नमुने तपासण्यात आले आहेत.

देशात 7 जुलै रोजी 1 कोटी चाचण्या पूर्ण झाल्या होत्या त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी 2 कोटी, 17 ऑगस्टला 3 कोटी आणि 29 ऑगस्ट रोजी 4 कोटी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

मागील तीन दिवसांपासून देशात 70 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मागील 24 तासांत देशभरात 76 हजार 472 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून 1,021 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 34.63 लाखांवर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 34 लाख 63 हजार 973 झाली आहे. यापैकी सध्या 7 लाख 52 हजार 424 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर 26 लाख 48 हजार 999 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात गेल्या 24 तासांत 1,021 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 62 हजार 550 रुग्णांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

देशात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असली तरी देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मागील 24 तासांत देशभरात 65 हजार 050 रूग्ण बरे झाले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 76.47 टक्के एवढी झाली आहे तर, मृत्यूदर 1.81 टक्के एवढा झाला आहे. देशात 21.90 टक्के सक्रिय रुग्ण आहेत.

देशात दररोज नऊ ते दहा लाख चाचण्या करण्यात येत असल्यामुळे रुग्ण संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून देशातील मृत्यूदर ही दोन टक्यापेक्षा खाली आला आहे.