India Corona Update : गेल्या 24 तासांत 20 हजारांहून कमी रुग्ण, सक्रिय रुग्ण तीन लाखांच्या आत

एमपीसी न्यूज – देशात गेल्या काही दिवसांपासून 25 हजारांच्या आसपास नवे कोरोना रुग्ण वाढत आहेत. गेल्या 24 तासांत 19 हजार 556 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, मागील काही दिवसांतील हि निच्चांकी वाढ आहे. दुसरीकडे गेल्या 24 तासांत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 30 हजार 376 एवढी आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घटली असून ती तीन लाखांच्या आत आली आहे.

नव्यानं वाढ होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत आहे तर, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. देशात सध्या 2 लाख 92 हजार 518 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 75 हजार 116 एवढी झाली आहे. त्यापैकी 96 लाख 36 हजार 487 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.64 टक्के एवढं झाले आहे.

मागील 24 तासांत देशभरात 301 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 1 लाख 46 हजार 111 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 1.45 टक्के एवढं आहे. आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 16 कोटी 31 लाख 70 हजार 557 नमूने तपासण्यात आले आहेत. शुक्रवारी (दि. 21) त्यापैकी 10 लाख 72 हजार 228 नमूने तपासण्यात आले आहेत.

युनायटेड किंग्डममधून भारतात येणाऱ्या विमानांवर 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. 22 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत ही बंदी असणार आहे. युनायटेड किंग्डममध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. युकेमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळल्याने तिथे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लॉकडाउन पुन्हा एकदा लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर युनायटेड किंग्डममधून भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.