India Corona Update : गेल्या 24 तासांत 15 राज्य व केंद्र शासित प्रदेशात एकही मृत्यू नाही

पाच आठवड्यात मृतांच्या संख्येत 55 टक्के घट

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रूग्ण वाढीचा वेग मंदावला आहे तसेच मृतांच्या संख्येत देखील लक्षणीय घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशातील 15 राज्य व केंद्र शासित प्रदेशात एकाही रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही. मागील पाच आठवड्यात दररोज होणा-या मृत्यूमध्ये 55 टक्क्यांनी घट झाली आहे.

आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषदेत दिलेल्या माहिती नुसार, जानेवारीच्या दुस-या आठवड्यात सर्वाधिक 211 रूग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात 96 रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

मागील काही दिवसांपासून देशात दररोज होणा-या मृतांची संख्या शंभरच्या आत आहे. देशातील कोरोनाच्या संदर्भात हि सकारात्मक बाब असल्याचे सचिवांनी म्हटले आहे.

देशातील सात राज्य आणि केंद्र शासित प्रदेश असे आहेत ज्या ठिकाणी मागील तीन आठवड्यांपासून एकाही कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली नाही. तसेच, देशातील 33 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश असे आहेत ज्या ठिकाणी पाच हजारहून कमी सक्रिय रूग्ण आहेत.

महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यात देशातील एकूण रूग्णांपैकी 71 टक्के सक्रिय रूग्ण आहेत. केरळमध्ये 45 टक्के, महाराष्ट्र 25, कर्नाटक 4 आणि पश्चिम बंगाल व तमिळनाडू प्रत्येकी 3-3 टक्के सक्रिय रूग्ण आहेत.

भारताचा मृत्यू दर 1.43 टक्के असून जगातील हा सर्वात कमी दरापैकी एक आहे. जागतिक सरासरी 2.18 टक्के आहे. बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.25 टक्के पोहचला आहे.

भारतात सध्याच्या घडीला 1 लाख 43 हजार 625 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली त्यापासून आतापर्यंत 62 लाख 59 हजार 008 जणांचे लसीकरण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.