India Corona Update: देशातील कोरोना रुग्णांची संख्या 14 लाखांच्या पुढे, 24 तासांत सर्वाधिक 49,931 रुग्ण

India Corona Update: Number of Corona patients in the country exceeds 14 lakh, highest 49,931 patients in 24 hours मागील 24 तासांत देशभरात 31,901 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 63.92 टक्के एवढी झाली आहे.

एमपीसी न्यूज – देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 14 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक 49,931 रुग्णांची वाढ झाली असून देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 14,35,453 एवढी झाली आहे. देशात मागील 24 तासांत 708 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी सध्या 4,85,117 सक्रिय रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशात आजवर तब्बल 9,17,568 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 31,901 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 63.92 टक्के एवढी झाली आहे.

देशातील कोरोना चाचणीची संख्या देखील वाढली आहे. देशभरात आजवर 1,68,06,803 चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 5,15,472 चाचण्या या रविवारी (दि.26) रोजी करण्यात आल्या आहेत.

रविवारी करण्यात आलेल्या चाचण्या या आजवरच्या एका दिवसातील सर्वाधिक चाचण्या आहेत. देशात रुग्ण वाढण्याचे कारण चाचण्यांचे वाढलेलं प्रमाण असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या 24 तासांत सर्वात जास्त 5 राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रात 9431, आंध्र प्रदेशात 7627, तमिळनाडू 6986, कर्नाटक 5199 आणि उत्तर प्रदेशामध्ये 3246 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये आणि काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.