India Corona Update: देशात दीड लाख लोकसंख्येमागे एक मृत्यू तर साडेचार हजार लोकसंख्येमागे एकाला कोरोना संसर्ग

India Corona Update: One corona death per 1.5 lakh population & one corona patient per 4.5 thousand population in the country कोरोनाबाधितांची संख्या कितीही वाढली तरी कोरोना बळींचा आकडा मर्यादित ठेवण्यात भारत यशस्वी झाला आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेतली कोरोनाविषयीची भीती दूर होण्यास निश्चितपणे मदत होऊ शकेल.

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) – देशात झपाट्याने वाढू लागलेल्या कोरोनाबाधितांचे व मृतांचे आकडे छातीत धडकी भरविणारे असले तरी जगाच्या तुलनेत भारतातील कोरोनाची परिस्थिती खूप बरी आहे, असेच म्हणावे लागेल. भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या तीन लाखांच्या पुढे गेली असली तरी भारताच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात ती फार निराश होण्यासारखी निश्चितच नाही. भारतात 4,455 लोकांमागे एकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. देशात आतापर्यंत 8 हजार 890 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे 1 लाख 55 हजार 153 लोकसंख्येमागे एकाचा मृत्यू होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

भारतात 257 लोकांमागे एक कोरोना चाचणी

भारतात कोरोना चाचण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची आकडेवारी झपाट्याने वाढताना दिसत आहे. भारतात एकूण 53 लाख 63 हजार 445 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. हे प्रमाण सध्या 257 लोकांमागे एक कोरोना चाचणी इतके आहे. अमेरिकेत हे प्रमाण 14 लोकांमागे एक चाचणी, ब्राझीलमध्ये 156 लोकांमागे एक चाचणी, रशिया आणि स्पेनमध्ये दर दहा लोकांमागे एक चाचणी झाली आहे. इटलीत 13 लोकांमागे एक तर जर्मनीत 18 लोकांमागे एकाची कोरोना चाचणी झाली आहे.

भारतात पॉझिटीव्ह रिपोर्टचे प्रमाण 5.77 टक्के

प्रगत देशांमध्ये सरसकट कोरोना चाचण्या करवून घेतल्या जात आहेत. भारतात मात्र संशयित रुग्णांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या तसेच पॉझिटीव्ह रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या करवून घेण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे त्यात पॉझिटीव्ह चाचण्यांचे प्रमाण जास्त असणे अपेक्षित आहे, प्रत्यक्षात पॉझिटीव्ह चाचण्यांचे प्रमाण 5.77 टक्के आहे. कोरोना चाचणीसाठी येणारा खर्च जास्त असल्याने सरसकट चाचण्या घेणे भारताला परवडण्यासारखे नाही आणि दुसरे म्हणजे त्याची आवश्यकताही नाही.

अमेरिकेत 156 लोकांमागे एकाला संसर्ग

भारतात 4,455 लोकांमागे एकाला कोरोनाचा संसर्ग झालेला असताना अमेरिकेत हे प्रमाण 156 लोकांमागे एक कोरोनाबाधित, ब्राझिलमध्ये 256 लोकांमागे एक कोरोनाबाधित, रशियात 285 लोकांमागे एक कोरोनाबाधित, इंग्लंडमध्ये 232 लोकांमागे एक कोरोनाबाधित, स्पेनमध्ये 161 लोकांमागे एक कोरोनाबाधित, इटलीत 256  लोकांमागे एक कोरोनाबाधित, पेरूमध्ये 149 लोकांमागे एक कोरोनाबाधित तर जर्मनीत 447 लोकांमागे एकाला कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

इंग्लंडमध्ये 1,636 लोकांमागे एक कोरोना बळी

भारतात 1 लाख 55 हजार 153 लोकसंख्येमागे एक कोरोना बळी गेलेला असताना अन्य देशांमधील हे प्रमाण खूपच चिंताजनक आहे. अमेरिकेत 2,833 लोकांमागे एक कोरोना बळी, ब्राझीलमध्ये 5,071 लोकांमागे एक कोरोना बळी, रशियात 21,732 लोकसंख्येमागे एक कोरोना बळी, इंग्लंडमध्ये 1,636 लोकसंख्येमागे एक कोरोना बळी, स्पेनमध्ये 1,723 लोकसंख्येमागे एक कोरोना बळी, इटलीत 1,767 लोकांमध्ये एक कोरोना बळी, पेरूमध्ये 5,223 लोकांमागे एक कोरोना बळी तर जर्मनीत 9,452 लोकसंख्येमागे एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला आहे.

भारतात कोरोनाचा मृत्यूदर 2.87 टक्के

कोरोनाबाधित आणि कोरोनाबाधित मृत यांचे जागतिक सरासरी प्रमाण 5.53 टक्के आहे. भारतात ते 2.87 टक्के आहे. म्हणजेच जागतिक सरासरीपेक्षा ते जवळजवळ निम्म्याने कमी आहे. रशियात हे प्रमाण सर्वात कमी म्हणजे 1.31 टक्के इतके कमी आहे. पेरूमध्येही भारताप्रमाणेच 2.86 टक्के प्रमाण आहे. अमेरिकेत 5.51 टक्के, ब्राझीलमध्ये 5.05 टक्के तर जर्मनीत 4.73 टक्के मृत्यूदर नोंदविला गेला आहे. हा साधारणपणे जागतिक सरासरीच्या आसपास आहे. मात्र इटली कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोना मृतांचे प्रमाण 14.48 टक्के, इंग्लंडमध्ये 14.16 टक्के तर स्पेनमध्ये 9.35 टक्के इतके असल्याचे पाहायला मिळत आहे.

भारतात 51.16 टक्के रुग्णांची कोरोनावर मात

या सर्व विश्लेषणाचा विचार करता भारतातील कोरोना संसर्गाचे प्रमाण, पॉझिटीव्ह चाचण्यांचे प्रमाण, कोरोना बळींचे प्रमाण हे अन्य देशांच्या तुलनेत खूप कमी आहे. त्याच बरोबर देशातील कोरोनामुक्तांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात सध्या 51.16 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 43.29 इतके कमी आलेले आहे. त्यामुळे फार चिंता करण्याचे कारण नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोरोनाबाधितांची संख्या कितीही वाढली तरी कोरोना बळींचा आकडा मर्यादित ठेवण्यात भारत यशस्वी झाला आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेतली कोरोनाविषयीची भीती दूर होण्यास निश्चितपणे मदत होऊ शकेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.