India Corona Update: देशात कोरोनाचे एक लाख बळी, जगातील 10 टक्के मृत्यू एकट्या भारतात

एमपीसी न्यूज – भारतात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या शनिवारी एक लाखांच्या पुढे पोहोचली. जगभरात आतापर्यंत करोनामुळे 10 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील एकूण मृत्यूंपैकी 10 टक्के मृत्यू एकट्या भारतात झाले आहेत. भारताच्या तुलनेत फक्त अमेरिका आणि ब्राझिलमध्ये सर्वात जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे.

देशात मागील 24 तासांत 79 हजार 476 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 1,069 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 64 लाख 73 हजार 545 एवढी झाली आहे. त्यापैकी 54 लाख 27 हजार 707 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशभरात 9 लाख 44 हजार 996 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात आजवर 7 कोटी 78 लाख 50 हजार 403 एवढ्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 11 लाख 32 हजार 675 इतके नमूणे शुक्रवारी (दि.2) तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

मागील 24 तासांत देशभरात 1,069 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील मृतांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील मृतांची संख्या 1 लाख 842 एवढी झाली आहे. भारतात गेल्या एका महिन्यापासून दिवसाला जवळपास एक हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू होतो आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भारतातील मृत्यूदर कमी होताना दिसत आहे. भारतात करोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 1.56 टक्के इतकं झालं आहे.
भारतातील एकूण मृत्यूसंख्येत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 38 हजार रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूदरदेखील जास्त असून 2.67 टक्के इतका आहे. तामिळनाडू आणि कर्नाटकात प्रत्येकी नऊ हजारापेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत तेथील मृत्यूदर 1.8 टक्के इतका आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी पाच हजारांहून जास्त मृत्यू झाले आहेत. सर्वाधिक मृत्यूदर पंजाबमध्ये आहे. पंजाबमध्ये रुग्णसंख्या एक लाख 15 हजार असून 3500 जणांचा मृत्यू झाला आहे. येथील मृत्यू दर सध्या तीन टक्क्यांवर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.