India Corona Update : दिलासादायक ! 24 तासांत एक लाख रुग्ण कोरोनामुक्त

देशात मागील 24 तासांत एक लाखापेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ही आजवरची बरे झालेल्या रुग्णांची उच्चांकी संख्या आहे.

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून दररोज 90 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात मागील 24 तासांत एक लाखापेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ही आजवरची बरे झालेल्या रुग्णांची उच्चांकी संख्या आहे. यासह देशातील कोरोनामुक्तांची संख्या 45 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 75 हजार 083 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 55 लाख 62 हजार 664 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 9 लाख 75 हजार 861सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 44 लाख 97 हजार 868 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

देशात मागील 24 तासात 1,053 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 88 हजार 935 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 80.85 टक्के एवढा आहे तर मृत्यूदर 1.59 टक्क्यापर्यंत खाली आला आहे. देशात आजवर 6 कोटी 53 लाख 25 हजार 779 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत त्यापैकी 9 लाख 33 हजार 185 चाचण्या या सोमवारी (दि.21) रोजी करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशातील सर्वाधिक रुग्ण हे 10 राज्यांमध्ये आहेत त्यातही निवडक जिल्ह्यातच अधिक रुग्ण आढळत आहेत. देशात कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन सिंग यांनी सांगितले. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक व उत्तर प्रदेश या राज्यांत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.