India Corona Update: भारतातील एक लाख कोरोनाबाधितांपैकी 39 हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात, 3,156 जणांचा मृत्यू

India Corona Update: Out of one lakh corona patients in India, more than 39 thousand patients overcome corona, 3156 died

एमपीसी न्यूज – भारताने काल (सोमवारी) रात्री कोरोनाबाधितांच्या संख्येचा एक लाखांचा टप्पा ओलांडला. एक लाख पेक्षा अधिक जणांना कोरोना संसर्ग झालेला भारत हा जगातील अकरावा देश ठरला आहे. कोरोनाची बाधा झालेल्या एकूण 1 लाख 328 पैकी 39 हजार 233 रुग्णांनी  (39 टक्के) कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे तर आतापर्यंत 3 हजार 156 रुग्णांचा (3.15 टक्के) मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येने एक लाखांचा ओलांडला असला तरी प्रत्यक्षात देशामध्ये कोरोनाचे 57 हजार 939 सक्रिय रुग्ण आहेत. 

वर्ल्डोमीटर डॉट इन्फो‘ व ‘कोविड 19 इंडिया डॉट ऑर्ग‘ या दोन वेबसाईटनी भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येने एक लाखांची संख्या ओलांडल्याचे म्हटले असले तरी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने मात्र अजून या आकडेवारीस दुजोरा दिलेला नाही. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारत एक लाखाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे दिसून येते. आरोग्य मंत्रालयाच्या नोंदीनुसार ही संख्या 96 हजार 169 इतकी आहे.

शासकीय आकडेवारीनुसार भारतातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 56 हजार 316 असून त्यापैकी 36 हजार 823 रुग्ण बरे झाले आहेत. शासकीय आकडेवारीनुसार भारतातील कोरोना बळींचा आकडा 3,028 इतका आहे.

भारतात 30 जानेवारीला केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर 110 दिवसांमध्ये कोरोना विषाणू भारतातील एक लाखपेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहचला आहे. विशेष म्हणजे गेल्या 18 दिवसांमध्ये 65 हजार 465 रुग्णांची भर पडली आहे. 30 एप्रिलला भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 34 हजार 863 होती.

भारताची लोकसंख्या सुमारे 137 कोटी 83 लाख आहे. त्यापैकी 23 लाख 02 हजार 792 जणांची कोरोना निदान चाचणी झाली आहे. भारतात दहा लाख लोकसंख्येमागे केवळ 1,671 जणांची कोरोना चाचणी झाली आहे.

भारतातील एकूण 1 लाख 328 कोरोनाबाधितांपैकी 39 हजार 233 रुग्ण बरे झाले असून 3 हजार 156 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण 42 हजार 389 केसेस निकाली निघाल्या आहेत. आता देशामध्ये कोरोनाचे 57 हजार 939 सक्रिय रुग्ण आहेत. निकाली निघालेल्या केसेसमध्ये कोरोनामुक्तांचे प्रमाण 93 टक्के तर मृतांचे प्रमाण 7 टक्के असल्याचे दिसून येत आहे.

भारतात एक लाख लोकसंख्येत सात जणांना कोरोना संसर्ग

भारतात कोरोना संसर्गाचे प्रमाण जगाच्या तुलनेत खूपच कमी असल्याचा दावा भारत सरकारने केला आहे. एक लाख लोकसंख्येमागे 7.1 जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे ‘पीआयबी’ने (Press Information Bureau) म्हटले आहे. जगात हे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे 60 इतके आहे. स्पेनमध्ये हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 494 तर अमेरिकेत हे प्रमाण 431 आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.