India Corona Update : 24 तासांत देशभरात विक्रमी 95 हजार 880 रुग्ण कोरोनामुक्त

देशाचा रिकव्हरी रेट 79.28 टक्के; जगातील सर्वाधिक बरे झालेल्या रुग्णांची संख्या भारतात

एमपीसी न्यूज – देशात मागील काही दिवसांपासून 90 हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. मात्र, मागील 24 तासांत देशभरात विक्रमी 95 हजार 880 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 42 लाखांहून अधिक झाली आहे. देशाचा रिकव्हरी रेट 79.28 टक्के एवढा आहे. बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत अमेरिकेच्या पुढे गेला आहे. जगातील सर्वाधिक बरे झालेल्या रुग्णांची संख्या भारतात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील 42 लाख 08 हजार 431 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 93 हजार 337 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 53 लाख 08 हजार 017 एवढी झाली आहे.

भारतात सध्या 10 लाख 13 हजार 964 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत देशभरात 1,247 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत जवळपास 85 हजार 619 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा मृत्यूदर 1.61 टक्के एवढा आहे.

‘आयसीएमआर’ने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत सहा कोटी 24 लाख 54 हजार 254 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी गुरुवारी 8 लाख 81 हजार 911 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

जगात अमेरिकानंतर भारतामध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वेगानं वाढत आहे.

गेल्या 24 तासांत देशात विक्रमी 95 हजार 880 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यापैकी 60 टक्के बरे झालेले रुग्ण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक व उत्तर प्रदेश राज्यातील आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.