India Corona Update : धक्कादायक! फक्त सहा दिवसांत एक लाख रुग्ण वाढले, एकूण रुग्ण पाच लाखांच्या पुढे

India Corona Update: Shocking! In just six days, the number of patients increased by one lakh, to five lakh आजपर्यंत 2,95,881 रुग्ण कोरोनामुक्त तर 1,97,387 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना बाधितांची संख्या पाच लाखांच्या पुढे गेली असून फक्त सहा दिवसात एक लाख रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे. मागील 24 तासांत उच्चांकी 18,552 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

देशातील एकूण रुग्ण संख्या 5,08,953 एवढी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चार लाखावरून पाच लाख रुग्ण संख्या होण्यासाठी फक्त सहा दिवसांचा कालावधी गेला असल्याचे समोर आले आहे. मागील 24 तासांत आजवरची ‘उच्चांकी’ 18,552 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 384 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 15,685 इतकी झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण रुग्ण संख्या पैकी, आजवर 2,95,881 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर, 1,97,387 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात गेल्या 24 तासांत 10,244 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्रात काल सर्वाधिक 5,024 नव्या रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या दीड लाखाच्या पुढे गेली आहे. पैकी 79,815 रुग्ण बरे झाले आहेत तर 65,844 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात आजवर 7,106 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिल्लीत मागील 24 तासांत 3460 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 77,240 वर जाऊन पोहचली आहे. दिल्लीमध्ये काल दिवसभरात सर्वाधिक 21144 एवढ्या चाचण्या करण्यात आल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.

देशात सुरुवातीचे एक लाख रुग्ण सापडण्यासाठी 107 दिवसांचा कालावधी गेला होता. त्यावेळी रुग्णवाढीचा दर 5.1 टक्के एवढा होता. मागील फक्त सहा दिवसात एक लाख रुग्णांची वाढ झाली असून देशातील रुग्ण संख्या चार लाखांवरून पाच लाखावर पोहोचली आहे. मात्र, रुग्णवाढीचा दर 3.7 टक्के एवढा झाला आहे.

जगातील कोरोना रुग्णांची संख्या एक कोटींच्या उंबरठ्यावर असताना देशात दिवसेंदिवस उच्चांक गाठणारी कोरोनाबाधितांची संख्या प्रशासन व नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.