India Corona Update: एका दिवसांत सर्वाधिक 52 हजार 123 नवीन रुग्णांची वाढ

देशातील कोरोनामुक्तांचे प्रमाण 64.44 टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण 33.35 टक्के तर मृत्यू दर 2.21 टक्के

एमपीसी न्यूज – भारतात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत तब्बल 52 हजार 123 नव्या रुग्णांची भर पडली आहे. ही आतापर्यंतची देशातील एका दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. त्यामुळे देशातील आतापर्यंतची कोरोनाबाधितांचा एकूण संख्या 15 लाख 83 हजार 792 झाली. मागील 24 तासांत देशातील 32 हजार 553 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने देशातील कोरोनामुक्तांची एकूण संख्या 10 लाख 20 हजार 582 झाली. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 64.44 टक्के झाले आहे. 

देशात मागील 24 सातांत 775 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंतचा कोरोना बळींचा एकूण आकडा 34 हजार 968 वर जाऊन पोहचला आहे. देशातील कोरोना मृत्यूदर 2.21 टक्के पर्यंत खाली आला आहे. कोरोना बळींची जागतिक सरासरी टक्केवारी 3.90 टक्के आहे. जगाच्या तुलनेत भारतातील मृत्यूदर खूप कमी असल्याचे दिसून येत आहे.

देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण आता 33.35 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. सध्या देशातील विविध रुग्णालयांमध्ये 5 लाख 28 हजार 242 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 8 हजार 944 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. एकूण रुग्णांमध्ये गंभीर अथवा चिंताजनक प्रकृती असणाऱ्या रुग्णांची प्रमाण 1.69 टक्के आहे. उर्वरित 98.31 टक्के रुग्णांना कोरोनाची सौम्य लागण आहे. देशातील रुग्ण संख्येत मागील 24 तासांत तब्बल 18 हजार 795 ने सक्रिय रुग्ण संख्या वाढली आहे. 

देशात 29 जुलैला 4 लाख 46 हजार 642 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशात एकूण एक कोटी 81 लाख 90 हजार 382 कोरोना चाचण्या झाल्याचे ‘आयसीएमआर’ने म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.