India Corona Update: देशात कोरोना बाधितांचा आकडा 1 लाख 31 हजारांवर, रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 41.28 %

India Corona Update: The number of corona cases in the country is 1 lakh 31 thousand, the cure rate is 41.28%.

एमपीसी न्यूज – गेल्या तीन दिवसांपासून देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात सहा हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या देशासाठी चिंतेची बाब ठरली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 6767 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत तर 147 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या एक लाख तीस हजारांच्यावर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 3867 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 1,31,868 वर पोहोचला आहे. यापैकी 73,560 हे ऍक्टिव्ह रुग्ण असून 54,441 रुग्ण बरे झाले असून देशात रूग्ण बरे होण्याची टक्केवारी 41.28 % झाली आहे. तर 3867 जणांचा आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले असून त्यांची संख्या 47 हजार 190 अशी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू 15 हजार 512, तिसऱ्या क्रमांकावर गुजरात 13 हजार 664, चौथ्या क्रमांकावर दिल्ली 12 हजार 910 आणि राजस्थान 6 हजार 742 रूग्णांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

देशात करण्यात आलेल्या देशव्यापी लाॅकडाऊनचा चौथा टप्पा येत्या 31 मे रोजी संपत असून लाॅकडाऊनचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान, देशात दररोज पाच हजारहून अधिक रुग्णांची भर पडत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.