India Corona Update : संसर्गाचा वेग मंदावला, सक्रिय रुग्णांची संख्या झाली कमी

एमपीसी न्यूज – देशात दररोज वाढ होणा-या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असून कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असल्याचं चित्र आहे. मागील 24 तासांत देशभरात 55 हजार 722 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 579 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून, देशात सध्या 7.72 लाख सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.‌

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 75 लाख 50 हजार 273 एवढी झाली आहे. देशात 7 लाख 72 हजार 055 सक्रिय रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत 66 लाख 63 हजार 608 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

कोरोना मृतांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मागील 24 तासांत 579 रुग्णांचा मृत्यू झाला असून काल झालेल्या मृत्यू पेक्षा आज जवळपास पन्नास टक्के घट झाली आहे. देशात आतापर्यंत जवळपास 1 लाख 14 हजार 610 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 66 हजार 399 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा कोरोना रिकव्हरी रेट सध्या 88.25 टक्के एवढा झाला आहे. तर, मृत्यूदर 1.51 टक्के एवढा आहे.

देशात आतापर्यंत 9 कोटी 50 लाख 83 हजार 976 एवढे नमूणे तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 8 लाख 59 हजार 786 एवढ्या चाचण्या रविवारी (दि.18) रोजी पूर्ण झाल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात वाढलेलं चाचण्यांचे प्रमाण आणि घटत चाललेली रुग्ण संख्या एक चांगली बाब मानली जात आहे. मागील काही दिवसांपासून देशात दररोज नव्यानं वाढ होणा-या रुग्णापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून संसर्गाचा वेग मंदावला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.