India Corona Update : 201 दिवसांनंतर देशात 20 हजारांहून कमी रुग्ण, दिवसभरात एक कोटी लसीकरण

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना आकडेवारीबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशात वीस हजारांपेक्षा कमी कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 201 दिवसातील ही निचांकी रुग्ण वाढ आहे. दुसरी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत एक कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत देशभरात 18 हजार 795 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 26 हजार 030 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यासह भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 36 लाख 97 हजार 581 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 29 लाख 58 हजार 002 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात सध्याच्या घडीला 2 लाख 92 हजार 206 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.80 टक्के एवढा झाला आहे. मागील 24 तासांत देशात 179 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. भारतात आजवर 4 लाख 47 हजार 373 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे.

दरम्यान, आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 56 कोटी 57 लाख 30 हजार 031 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 13 लाख 21 हजार 780 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 87 कोटी 07 लाख 08 हजार 636 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 1 कोटी 02 लाख 22 हजार 525 जणांना लस टोचण्यात आली आहे.

इतर राज्यांच्या तुलनेत केरळमध्ये कोरोनाचा वेग अधिक असल्याचे दिसून येत आहे. देशात नोंद झालेल्या 18 हजार 795 रुग्णापैकी 11 हजार 699 रुग्ण एकट्या केरळमधील आहेत. तर, महाराष्ट्रात 2 हजार 432 कोरोना रुग्ण वाढले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.