Pune : भारत हा वाहन उद्योगासाठी जागतिक स्तरावर महत्त्वाचा देश – निखील ओसवाल

एमपीसी न्यूज – आज भारतात वाहनउद्योग क्षेत्रात तंत्रज्ञान, उत्पादन अशा सर्वच आघाड्यांवर बदल होत आहेत, त्यामुळे हे क्षेत्र देखील आता ‘ग्लॅमरस’ झाले असून नजीकच्या भविष्यात भारत हा जागतिक स्तरावर वाहनउद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाचा देश आहे, असे ग्लोबल इंडियन बिझिनेस फोरमचे इंटरनॅशनल सप्लाय चेन एज्युकेशन अलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वर्ल्ड ट्रेड सेंटर, पुणेचे निखील ओसवाल यांनी केले. वाहन उद्योग क्षेत्राला स्वत:ला प्रस्थापित करण्याची भारतामध्ये प्रचंड क्षमता असून दरवर्षी २० दशलक्ष वाहनांची निर्मिती करणारा चीन हा आपला प्रतिस्पर्धी आहे. मात्र, पुढील तीन वर्षांत भारतात या क्षेत्रातील जगभरातील महत्त्वाचे ब्रँड असतील असेही ते यावेळी म्हणाले.    

‘प्राईमव्हॅल्यू मार्केटिंग सर्व्हिसेस’च्या वतीने येरवडा येथील डेक्कन कॉलेजच्या मैदानात जागतिक स्तरावरील ‘पुणे मोटार शो २०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ‘वाहन उद्योग क्षेत्र आणि भविष्य’ या विषयावर ओसवाल यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

पुण्यातील एकमेव फॉरम्युला फोर रेस कार चालविणा-या महिला चालक डायना पंडोले, नावाजलेले मोटार टेस्टर राहुल बाम आणि ओसवाल यांच्याशी यावेळी विशाल मीनावाला यांनी संवाद साधला. ‘प्राईम व्हॅल्यू मार्केटिंग सर्व्हिसेस’च्या संचालिक वीणापाणी जोशी या देखील यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना ओसवाल म्हणाले की, आज हायड्रोजन इंधन वाहने, इलेक्ट्रिक वाहने ही सर्वसामान्यांना परवडणा-या दरात नाहीत, मात्र जेव्हा मोठ्या प्रमाणात त्यांचे उत्पादन होईल आणि ती बाजारात येतील तेव्हा त्यांच्या किंमतीत नक्कीच फरक पडेल आणि नव्या पिढीचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील बदलेल.

आज वाहन रेंट करणे, हायर आणि पे करणे याकडे तरुणाईचा सर्वाधिक ओढा असून देशात मोठ्या प्रमाणात ‘उबरायजेशन’ होत असल्याचे देखील ओसवाल यांनी नमूद केले. आज प्रवास महत्त्वाचा असला तरी स्वत: वाहन चालविण्यास अनेक जण फारसे इच्छुक नसतात अशांसाठी भविष्यात तंत्रज्ञानात होणारे महत्त्वपूर्ण बदल ही जमेची बाजू असेल. याबरोबरच भविष्यात वाहनांच्या ‘क्वालिटी’ बरोबर ‘कम्फर्ट’ देखील तितकाच महत्त्वाचा होणार असून यासाठी ग्राहक मोठ्या चारचाकी गाड्यांना पसंती देत आहेत. पण या गाड्या शहरात वापरण्यावर मर्यादा असल्याने लहान, पॉवरफुल आणि परवडणा-या चारचाकींची मागणी वाढेल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना डायना पंडोले म्हणाल्या, “एक रेसर म्हणून ट्रॅकवर गाडी चालविणे हा माझ्यासाठी नेहमीच एक थरारक अनुभव असतो आणि मला ते ‘थ्रील’ आवडते. हे करीत असताना अपघात होताना काय टाळले जाऊ शकते हे मला नक्कीच शिकायला मिळाले.”

मी एक महिला आहे म्हणजे चांगली चालक नसेल हे आधीच गृहीत धरून मला पडताळणारे अनुभव या क्षेत्रात अनेकदा आले. पण महिला आहे म्हणून वाईट चालक असेलच ही मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत पंडोले यांनी व्यक्त केले.

यावेळी राहुल बाम यांनीही आपण बाईक रेसिंग क्षेत्रात कसे आलो याचे अनुभव सांगत आपल्या मोटार ट्रेक्स आणि टेल्स विषयीचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले.

खास वाहनप्रेमींसाठी उद्या रविवारपर्यंत येरवडा येथील डेक्कन कॉलेज मैदावर ‘पुणे मोटार शो २०१९’ या जागतिक दर्जाच्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने चारचाकी, दुचाकीचे विविध ब्रँडस्, प्रात्यक्षिके, ऑटो अॅक्सेसरीज् यांबरोबरच बॅटमॅन कार, विंटेज कार एकाच छताखाली पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सदर प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.