Indian Navy Sailing Championship 2021: ‘इंडियन नेव्ही सेलिंग चॅंपियनशिप-2021’; सर्वात मोठी आंतर-नौदल नौवहन स्पर्धा मुंबईत

एमपीसी न्यूज – मुंबईतील भारतीय नौदल नौवहन प्रशिक्षण केंद्रातर्फे (INWTC) 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2021 या कालावधीत इंडियन नेव्ही सेलिंग चॅंपियनशिप-2021 ही सर्वात मोठी आंतर-नौदल नौवहन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्या निमित्ताने पुढील पाच दिवस भारतीय नौदलाच्या तीन कमांड म्हणजेच पश्चिमी नौदल कमांड, पूर्व नौदल कमांड आणि दक्षिणी नौदल कमांड यामधील नौवाहक महिला व पुरुषांना मुंबई बंदरावर आपापल्या नौकानयन व नौवहनाचे कौशल्याचे प्रदर्शन करता येणार आहे.

या स्पर्धेत सात प्रकारच्या नौकाच्या प्रकारात मिळून एकूण 90 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. टीम रेसिंग इन एन्टरप्राईज ही सामुहिक स्पर्धा आणि मॅट रेसिंग इन J24 या प्रकारातील बोटींचा समावेश पुन्हा करण्यात आला आहे. गटाचे मनोधैर्य वाढवणे आणि सहभागींमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग होणार आहे. सर्व प्रकारच्या स्पर्धांचा विजेता समारोपाच्या (दि. 5 ऑक्टोबर) दिवशी घोषित केला जाणार आहे.

भारतीय नौदल नौवहन प्रशिक्षण केंद्रातर्फे (INWTC), मुंबई 1 ऑक्टोबर 2021 रोजी 75 स्पर्धा सहभागींची नौवहन परेड होणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून साजरा होत असलेल्या ‘आजादी का अमृतमहोत्सव’च्या निमित्ताने भारतीय नौदल आयोजित करत असलेल्या कार्यक्रमांपैकी हा एक उपक्रम आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.