IND vs NZ 3rd T20 : भारताने न्यूझीलंड संघाचा केला तीन शून्य असा दणदणीत पराभव

रोहीत कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत ठरला मालिकेचा मानकरी

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : पूर्ण वेळ कर्णधार म्हणून खेळणाऱ्या रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली अधिकाधिक युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या टी-20 विश्व करंडक स्पर्धेतल्या उपविजेते असलेल्या किवी संघाला 73 धावांनी मात देत  तीन शून्य असे दणदणीत पराभूत करून व्हाईट वॉश देताना स्वप्नवत कामगिरी केली.

या आधीच दणदणीत विजयासह मालिका भारतीय संघाने जिंकली असल्याने या सामन्याच्या निकालाने भारतीय संघाला विशेष फरक पडणार नव्हता,त्यामुळे आज संघात काही बदल होईल का आणि पुणेकर ऋतुराज गायकवाडला संधी मिळणार का याची उत्सुकता सर्वाना होती. संघात बदल झाला, एक नाही तर दोन बदल झाले,पण दुर्दैवाने ऋतुराज संघात स्थान मिळवू शकला नाही, मात्र नशिबाने साथ दिली ती ईशान किशन आणि यजुवेंद्र चहलला.लोकेश राहुल आणि आर अश्विनला आराम देण्यात आला.

मालिका गमावून बसलेल्या पाहुण्या संघाला किमान या सामन्यात पराभव टाळून आपली प्रतिष्ठा जपायची होती.त्यामुळेच त्यांनी आज टीम साऊदी ऐवजी कर्णधारपदाची जबाबदारी मिचेल सिंटनरकडे दिली.आणि त्याच्याऎवजी मिल्नेला संघात स्थान दिले.

 भारतातले आणि जगातल्या एका सुंदर आणि ऐतिहासिक एडन गार्डनच्या कोलकाता येथील या मैदानावर नाणेफेकीचा कौल आजही पाहुण्या संघाच्या विरोधातच गेला आणि रोहीत शर्माने या मालिकेत पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.आज के एल राहुल ऐवजी संघात स्थान मिळालेल्या ईशान किशन सोबत रोहीतने भारतीय डावाची सुरुवात केली.या दोघांनीही आक्रमक आणि आकर्षक फलंदाजी करताना सहा षटकाच्या आतच संघाचे अर्धशतक नोंदवले.

केवळ 33 चेंडूतच भारतीय संघाचे पहीले अर्धशतक आले. यामुळेच पहिल्या पॉवरप्ले अखेरीस भारताने बिनबाद 69 धावा फलकावर लावल्या होत्या.या चांगल्या सुरुवातीमुळे भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य खुणावत असतानाच पॉवरप्ले नंतरच्या दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार सिंटनरने डावखुऱ्या ईशान किशनला एका हळूवार चेंडूने फसवत यष्टीमागे झेलबाद करून भारताला पहिला धक्का दिला. किशनने 21 चेंडूत 29 धावा काढताना सहा चौकार मारले. त्याच्या जागी आलेला यादवाचा सूर्य आज काहीच तळपला नाही आणि केवळ दोन चेंडू खेळून धावसंख्येत काहीही भर न घालता अन भोपळा न फोडताच तंबूत परतला.

यामुळे बिनबाद 69 वरून भारतीय संघाची स्थिती दोन बाद 69अशी झाली होती. त्यामुळेच संघ व्यवस्थापनाने उजव्या हाताने खेळणाऱ्या श्रेयस अय्यरऐवजी स्फोटक फलंदाजी करणाऱ्या डावऱ्या पंतला चौथ्या क्रमांकावर पाठवले. मात्र पंतने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केलाच नाही. अति आक्रमता हा पंतचा फार मोठा दुर्गुण आहे. आजही त्याने आल्याआल्याच परिस्थितीचा अंदाज न घेताच खराब फटका मारुन आपली विकेट गमावली. ही विकेट सिंटनरच्या खात्यात गेली असली तरी ती पंतनेच त्याला बहाल केली असे म्हटले तर त्यात काहीही चूक ठरणार नाही.

लागोपाठ पडलेल्या या विकेट्सने न डगमगता रोहीतने आपले या मालिकेतले सलग दुसरे अर्धशतक केवळ 30 चेंडूतच नोंदवले खरे पण अर्धशतकी खेळी झाल्या झाल्या तो ईश सोधीच्या एका अविश्वसनिय झेलामुळे 55 धावा काढून तंबूत परतला. सोधीने आपल्याच गोलंदाजीवर केवळ एका हाताने हा झेल ज्या चपळाईने घेतला ते पाहून रोहीत पासुन ते समालोचकांपर्यंत सर्वच आश्चर्यचकित झाले.पाहुण्या संघासाठी ही विकेट म्हणजे निव्वळ एक बोनस ठरली कारण रोहीत आज फारच जबरदस्त खेळत होता. त्याने केवळ 31 चेंडूत 55 धावा करताना सहा चौकार आणि तीन उत्तुंग षटकार मारले. पण भारतीय संघाच्या या पडझडीने क्रिकेट किती अनिश्चित खेळ आहे याची प्रचिती पुन्हा एकदा सर्वाना आली.

बिनबाद  69 या सुस्थितीत असताना ते चार बाद 103 अशी भारतीय संघाची बिकट अवस्था झाली. यानंतर मात्र वेंकटेश आणि श्रेयस या अय्यर खेळाडूंनी समयसुचकता दाखवत समजूतदारीने खेळ करायला सुरुवात केली. चांगल्या चेंडूला योग्य तो सन्मान देताना खराब चेंडूवर कडक प्रहार करत यांनी डावाला गती दिली असे वाटत असतानाच या दोघांनीही आततायीपणा करून आपल्या विकेट्स गमावल्या. श्रेयस 25 तर वेंकटेश 20 धावा करून बाद झाले.

आज न्यूझीलंड गोलंदाजांनी विकेट्स मिळवल्या असे म्हणण्यापेक्षा भारतीय फलंदाजांनी विकेट्स गमावल्या असे म्हणणे जास्त योग्य राहील. अपवाद कर्णधार रोहीतचा. अखेर नवोदित हर्षल पटेल आणि शेवटच्या षटकात दीपक चहरने केलेल्या आक्रमक 8 चेंडूतल्या नाबाद 21 धावांमुळे भारताने आपल्या निर्धारित 20 षटकात 184 धावा केल्या. न्यूझीलंड संघाकडून कर्णधार सिंटनरने जबरदस्त गोलंदाजी करत तीन गडी बाद केले. तर बोल्ट, सोधी, फर्ग्युसन व मिल्नेने एकेक गडी बाद करून त्याला चांगली साथ दिली. कारण एकवेळ भारत दोनशेहुन अधिक धावा करेल असे वाटत असतानाच सिंटनरने सामन्यात किवी संघाला वापस आणले.

आता फलंदाजांनी जबाबदारी उचलायची होती आपल्या संघाचा आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा राखण्याची. 184 धावांचा पाठलाग करताना फॉर्म मधल्या आणि नुकताच टी-20 मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या गुप्टील आणि मिचेलने सुरुवात तर जोरदार केली होती, त्यातच दीपक चहरने आपल्याच गोलंदाजीवर एक झेल सोडून पाहुण्या संघाच्या फलंदाजीला जणू हातभारच लावला होता, पण अक्षर पटेलने मात्र आपला दमखम दाखवताना आपल्या पहिल्याच आणि सा मन्याच्या चौथ्याच षटकात मिचेल आणि चॅपमनला तंबूत पाठवून भारताला जोरदार सुरुवात करून दिली.आणि आपल्या दुसऱ्या षटकात ग्लेन फिलिप्ललाही बाद करून तिसरा धक्का दिला.

मात्र या धक्क्याने जराही विचलित न होता मार्टिन गुप्टीलने अतिक्रमण हाच सर्वोत्तम बचाव या क्रिकेटमधल्या चिरपरिचित सुभाषीताची अनुभूती देताना आपले एकंदरीत 20वे आणि या स्पर्धेतले दुसरे अर्धशतक केवळ 31 चेंडूतच पूर्ण करत आम्ही अजूनही विजयासाठी लढणार आहोत याची जाणिव करून दिली.त्याने चार चौकार आणि चार उत्तुंग षटकारासह ही अर्धशतकी खेळी सजवली.किवी संघाच्या 69 पैकी त्याच्या एकट्याच्याच 51 धावा झाल्या होत्या, त्याच्या या झंझावाताने भारतीय गोलंदाज पुरते भांबावले आहेत असे वाटत असतानाच पुनरागमन करणाऱ्या यजुवेंद्र चहलने त्याची ही खेळी सुर्यकुमार यादवच्या हातून संपवून भारतीय संघासाठी विजयाचे दरवाजे पुन्हा उघडले.

त्यातच इशान किशनच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाने टीम सिफर्टला धावबाद केले आणि 12 व्या षटकात न्यूझीलंड संघाची अवस्था 5 बाद 76 अशी झाली. आणि जवळपास सर्वच प्रतिथयश फलंदाज बाद झाल्याने विजयाची औपचारिकताच बाकी होती. एक जिम्मी निशम सोडला तर त्यालाही याच धावसंख्येवर हर्षल पटेलन पंतने एक अप्रतिम झेलाच्या मदतीने बाद करून पाहुण्या संघाची अवस्था आणखीनच बिकट करून सोडली. त्यामुळे भारत फक्त कधी आणि किती धावांनी जिंकणार ही एकमेव उत्सुकता उरली होती, ती अगदी थोड्याच वेळात पूर्ण झाली.

हर्षल पटेलने दोन, तर चहर, चहल तर वेंकटेश अय्यरने एक एक बळी घेतला तर तीन षटकात केवळ 9 धावा देत तीन महत्वपूर्ण बळी घेत न्यूझीलंड संघाच्या परतीच्या दरवाजांना बंद करणारा अक्षर पटेल सामन्याचा मानकरी तर उत्कृष्ट फलंदाजी करून आपल्या कर्णधारपदाच्या सुरुवातीतच सर्वाना प्रभावीत करणारा रोहीत शर्मा मालिकावीर ठरला.

एकंदरीत या दणदणीत विजयाने हौद से गयी लेकिन बुंदसे मिली अशी काहीशी परिस्थिती विश्व करंडक मधल्या निराशाजनक कामगीरीचा काहीसा विसर भारतीय क्रिकेट चाहत्यांना नक्कीच पडेल अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट संघ बाळगत असेल,नाही का?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.