India Update: एका दिवसात 330 जणांना कोरोनाची बाधा, रुग्णांची संख्या 2,301 तर आतापर्यंत 56 मृत्यू!

एमपीसी न्यूज – भारतात काल (गुरुवारी) एका दिवसांत कोरोनाचे 330 नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,301 झाली आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधित मृतांचा आकडा 56 वर जाऊन पोहचला आहे. उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 165 आहे. देशात कोरोनाचे सध्या 2,088 रुग्ण सक्रिय आहेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. 

‘कोविड 19 इंडिया डॉट ऑर्ग’ या वेबसाईटवरील इंडिया कोविड -19 ट्रॅकरवर भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,579 इतकी दाखविण्यात येत आहे. त्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2,315 इतकी आहे. आज (शुक्रवारी) राजस्थानमध्ये कोरोनाचे नवीन 21, आंध्र प्रदेशमध्ये नवीन 12 तर गोव्यात एकाची नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण संख्येत 34 ची भर पडली आहे. आतापर्यंत 192 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर मृतांचा आकडा 72 असल्याचे या वेबसाईटने म्हटले आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक 423 कोरोनाबाधितांची नोंद असून 21 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. महांराष्ट्रात मुंबईत 198, पुण्यात 63, सांगलीत 25, अहमदनगर 19, नागपूर 12, ठाणे 10, बुलडाणा 6, यवतमाळ 4, मुूंबई उपनगर 4, सातारा 2, कोल्हापूर 2, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, गोंदिया या ठिकाणी प्रत्येकी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे. या व्यतिरिक्त अन्य विविध ठिकाणी मिळून 73 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 42 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 360 आहे.

तमिळनाडूत 309 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून आतापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तबलिगी जमात प्रकरणानंतर दिल्लीतील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येने मोठी वाढ दिसून आहेत. राजधानी दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या 293 झाली आहे. आतापर्यंत चार कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद आहे. प्रारंभी देशात कोरोना प्रादुर्भाव झालेल्या पहिल्या दोन राज्यांमध्ये समावेश असलेले केरळ आता चौथ्या क्रमांकावर गेले आहे.  केरळमध्ये कोरोना विषाणूची लागण 286 जणांना झाली. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. आंध्रप्रदेशमध्ये 161 जण तर राजस्थान व तेलंगणामध्ये प्रत्येकी 154 जण कोरोनाने बाधित झाले आहेत. या व्यतिरिक्त उत्तरप्रदेश (128), कर्नाटक (124) व मध्यप्रदेश (107) या तीन राज्यांनी कोरोना रुग्णांच्या संख्येचे शंभरी ओलांडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.