IND vs AUS : भारताचा ऑस्ट्रेलियन संघावर झुंजार विजय

एमपीसी न्यूज : भारतात होणाऱ्या 2023 च्या एकदिवसीय विश्वकप स्पर्धेच्या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून सुरु असणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्याच्या (IND vs AUS) मालिकेतल्या पहिल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला पाच गडी आणि जवळपास दहा षटके राखून पराभूत करताना झुंजार विजय मिळवला.

 

मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या आजच्या पहिल्या सामन्यासाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे उपलब्ध नसल्याने त्याच्या अनुपस्थित नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियन संघाला 188 धावांत गुंडाळून टाकले असले तरी या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची चांगलीच दमछाक झाली.

 

तीन बाद 16 नंतर 5 बाद 40 आणि मग 5 बाद 83 अशी बिकट धावसंख्या झाल्यानंतर खराब फॉर्ममुळे कसोटी संघाचे आधी उपकर्णधारपद गमवावे लागल्यानंतर संघातले स्थानही गमवावे लागलेल्या के एल राहुल आणि रवीन्द्र जडेजा या जोडीने केलेल्या झुंझार शतकीभागीदारीने अखेर भारताने ऑस्ट्रेलियन संघावर 5 गडी आणि 61 चेंडू राखत विजय मिळवून मालिकेचा विजयी श्रीगणेशा केला.अष्टपैलू कामगिरी करणारा जडेजा सामन्याचा मानकरी ठरला.

 

त्याआधी नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचीही सुरुवात खराबच झाली.मोहम्मद सिराजने सामन्याच्या दुसऱ्याच षटकात हेडला त्रिफळाबाद करत संघाला मोठेच यश मिळवून दिले.त्यानंतर मात्र मिशेल मार्श आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या गड्यासाठी 72 धावांची (IND vs AUS) वेगवान भागीदारी करत आलेले दडपण झुगारून लावले. ही जोडी डोकेदुखी वाढवतेय असे वाटत असतानाच भारतीय कर्णधार पांड्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथला बाद करुन ही जोडी तोडली,यानंतरही सलामीवीर मार्श  आणि लाबूशेन जोडीने जोरदार खेळ करत आणखी एक अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघावर दडपण वाढवले.

 

Pimpri News : बार्टीकडे अर्ज केलेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर व्हावी – अमित गोरखे

 

ऑस्ट्रेलियन फलंदाजी सहाहुन अधिक धावांच्या सरासरीने धावा चोपत होते. मार्श तर अतिशय खतरनाक मूडमध्ये खेळत होता.केवळ 65 चेंडूत 10 चौकार आणि 5 घणाघाती षटकारांसह त्याने 81 धावा करुन भारतीय गोलंदाजी नेस्तनाबूत केली होती, तो आपल्या शतकाकडे अशीच धडाकेबाज वाटचाल करतोय असे वाटत असतानाच जडेजाने त्याला सिराजच्या हातून झेलबाद केले आणि भारतीय संघाला  मोठेच यश मिळवून दिले.या धक्क्यातून सावरण्याआधीच लांबूशेनही फक्त 15 धावा काढून कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला तेंव्हा ऑस्ट्रेलियन संघाच्या 22षटकात 4 बाद 139अशी धावसंख्या होती, मात्र यानंतर पुढील फक्त 13 च षटकात ऑस्ट्रेलियन संघ फक्त 49 धावा काढून सर्वबाद झाला आणि भारतीय गोलंदाजानी जणू चमत्कारच केला.एकवेळ ऑस्ट्रेलियन संघ 300 च्या पुढे जाईल असे वाटत असतानाच शमी(3) ,जडेजा(2)आणि सिराजने(3) जबरदस्त गोलंदाजी करत भारतीय संघाला सामन्यात वापस आणले.

विजयासाठी 300 चेंडूत 189 धावांच्या सोप्या वाटणाऱ्या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातही अतिशय खराब झाली.मागील काही सामन्यापृवी द्विशतके करणारे गील आणि किशन या जोडीला आज अपयशाला सामोरे जावे लागले ,किशन तर दुसऱ्याच षटकात फक्त 3 धावा करून स्टोयनिसच्या (IND vs AUS) गोलंदाजीवर पायचीत झाला आणि स्टार्कने या धक्क्यातून भारतीय संघ सावरण्याआधीच कोहली आणि सूर्यकुमारला लागोपाठच्या चेंडूवर बाद करून भारतीय गोटात एकच खळबळ उडवून दिली.पाठोपाठ थोड्याच वेळात शुभमन गीलही स्टार्कच्याच गोलंदाजीवर बाद झाला आणि भारतीय संघ 4 बाद 39 अशा नाजूक परिस्थितीत अडकला.

या कठीण प्रसंगी कर्णधार पांड्या राहुलला साथ द्यायला आला आणि त्यांनी परिस्थितीओळखत समाजदारीने खेळत डाव सावरायला सुरुवात केली. ही जोडी जमतेय असे वाटत असतानाच कर्णधार पांड्या हुक मारण्याच्या नादात स्टोयनिसच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि भारतीय संघ 5 बाद 83 अशा कठीण परिस्थितीत आला.यावेळी भारतीय संघाला पराभवाचा धोका दिसत होता ,मात्र नुकतेच खराब कामगिरीमुळे कसोटी संघातले स्थान गमवावे लागणाऱ्या के एल राहुल आणि जडेजा यांनी अप्रतिम खेळत नाबाद शतकी आणि अभेद भागीदारी करत संघाला एक मोठा आणि झुंजार विजय मिळवून दिला. के एल ने एक शानदार आणि कठीण परिस्थितीत शानदार खेळी करत आपल्या वैयक्तिक 13 व्या अर्धशतकासह नाबाद 75 धावा करून संघ व्यवस्थापन आपल्यावर विश्वास का ठेवते याचेच उत्तर दिले तर त्याला जडेजाने नाबाद 45 धावा करत उत्तम साथ दिली.अष्टपैलू कामगीरी करणाऱ्या जडेजालाच सामन्यातला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. या विजयाने भारतीय संघाने तीन सामन्याच्या मालिकेत 1 /0  अशी विजयी आघाडी घेतली आहे.

विवेक कुलकर्णी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.