IND vs AUS Test Match : ऑस्ट्रेलियन संघाने उभारला धावांचा डोंगर

एमपीसी न्यूज : पहिले तिन्ही सामने कमी धावसंख्येचे झाल्यानंतर या मालिकेत पहिल्यांदाच एका संघाने तब्बल दोन दिवस खेळून काढले. हा संघ यजमान भारतीय संघ नसून इंदुर कसोटी जिंकल्यानंतर आत्मविश्वास कमालीचा बळावलेला पाहूणा ऑस्ट्रेलियन संघ आहे. (IND vs AUS Test Match) आजच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने उस्मान ख्वाजा आणि कॅमरॉन ग्रीनच्या शतकाच्या जोरावर 480 धावांचा डोंगर उभारून आपली बाजू भक्कम केली आहे,उत्तरादाखल खेळताना भारतीय संघाने आजच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा आजची आपली दहा षटके एकही गडी न गमावता खेळून काढताना  36 धावा करून समाधानकारक सुरूवात केली आहे.

कालच्या 4 बाद 255 वरुन आजच्या दुसऱ्या दिवशी खेळ सुरु झाल्यानंतर ग्रीन आणि ख्वाजा या नाबाद जोडीने आजही धीरोदात्तपणे खेळत भारतीय गोलंदाजीचे चांगलेच घामटे काढले. या जोडीने लंच पर्यंत आपल्या विकेट्स न गमावता जवळजवळ 100 धावा करुन भारतीय संघावर चांगलेच दडपण वाढवले,दरम्यान ख्वाजाने आपले दीडशतक पूर्ण केले तर ग्रीन भारतीय गोलंदाज पूर्णपणे बोथट ठरवत जोरदार फटकेबाजी करत आपल्या शतकाच्या पाच पाऊले जवळ आला. या दोन तासात एकही भारतीय गोलंदाज चमकदार कामगिरी करू शकला नाही, म्हणूनच लंचसाठी जेंव्हा दुसऱ्या दिवशीच्या  पहिल्या सेशनचा खेळ थांबला तेंव्हा ऑस्ट्रेलियन संघ चार बाद 348 अशा मजबूत स्थितीत दिसत होता.

मोठ्या खेळीसाठी प्रसिद्ध असणारा उस्मान ख्वाजा 150 तर ग्रीन 95 धावा काढुन तंबूत नाबाद परतले,ही भारतीय संघासाठी धोक्याची मोठीच सूचना होती.उपहारानंतरही या दोन्हीही फलंदाजांनी आपले वर्चस्व कायम राखायला सुरुवात करत आपापले वैयक्तिक मैलाचे दगड गाठताना ही कसोटी स्वतःसाठी अविस्मरणीय करतानाच संघालाही सुरक्षित स्थितीत आणून ठेवले. ग्रीनने आपले पहिले शतक पूर्ण केले  तर ख्वाजाने ऑस्ट्रेलियन भूमीबाहेर 161 धावा करताच आपली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या गाठली. (IND vs AUS Test Match) ही जोडी धोकेदायक ठरत आहे असे वाटत असतानाच अश्विनने शतकवीर ग्रीनला एका अप्रतिम स्विंगवर चकवले आणि कोडा भरतने यष्टीमागे एक अप्रतिम झेल घेत ग्रीनची यादगार खेळी समाप्त करत भारतीय संघाला आजचे पहिले यश मिळवून दिले,पण या जोडीने पाचव्या गडयासाठी 192 धावांची विशाल भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले, याच षटकात अश्विनने अलेक्स कॅरीलाही बाद करत भारतीय संघाला दुसरे यश मिळवून दिले.

कॅरीने अतिशय बेजबाबदार खेळत एक आततायी फटका मारला,ज्याचे मोठे नुकसान त्याला सोसावे लागले.या दोन लागोपाठच्या धक्क्यामुळे भारतीय संघ एकदम जोशात आला.त्यानंतर थोडयाच वेळात मिशेल स्टार्कही फक्त 6 धावा करूनअतिशय स्वस्तात बाद झाला.त्यालाही अश्विननेच बाद केले, यावेळेस भारतीय संघ ऑस्ट्रेलियन संघाला 425 च्या आत बाद करेल असे वाटत होते, कारण भारतात भारताविरुद्ध सर्वाधिक 432 चेंडू खेळून 180 धावांची मॅरेथॉन खेळी करणारा ख्वाजाही अक्षरच्या एका सुंदर चेंडु पायचीत झाला होता, पण त्यानंतर मर्फी आणि लायन यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेत अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाच्या जखमेवर जणू मीठ चोळण्याचे काम केले.

पहिल्या तिन्ही सामन्यात गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टी बनवलेल्या भारतीय संघाने या कसोटीत फलंदाज धार्जिनी खेळपट्टी बनवली,त्याचाच जबरदस्त फायदा उचलून कांगारू संघाने जबरदस्त फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारून आपली बाजू या कसोटीत चांगलीच मजबूत केली आहे.या जोडीने तब्बल 70 धावांची भागीदारी करुन   भारतीय संघाला चांगलेच नामोहरम केले. (IND vs AUS Test Match) ही जोडी तापदायक ठरत असताना अखेर हवीच अश्विनने टॉड मर्फीला 41 धावांवर बाद करुन ही जोडी तर फोडलीच त्याचबरोबर आपल्या करियरमध्ये 32 व्यांदा एका डावात 5 वा त्याहून अधिक बळी घेण्याची मोठी कामगिरी केली.त्याने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध 7व्यांदा अशी कामगिरी केली तर मायदेशात त्याने 26 व्यांदा एका डावात 5 बळी घेण्याची मोठी कामगिरी करून आपले नाव क्रिकेटच्या पुस्तकात सोनेरी अक्षराने गोंदवले आहे.

मर्फीनेही आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवून आपणही फलंदाजी करू शकतो हेच दाखवले आहे,त्यानंतर अगदी थोड्याच वेळात अश्विनने लायनलाही बाद केले आणि कांगारू संघाला 480 धावात रोखण्यात मोठा वाटा उचलला.त्याला शमीने दोन बळी तर जडेजा व अक्षर यांनी प्रत्येकी एकेक गडी बाद करत चांगली साथ दिली. फलंदाजीला अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर अश्विनने आपला क्लास दाखवत सहा गडी बाद केले पण तो ऑस्ट्रेलियन संघाच्या शेपूटाला लवकर गुंडाळू शकला नाही हे खेदाने म्हणावे लागेल. (IND vs AUS Test Match) कारण 8 बाद 409 नंतरही कांगारू संघाने 480 पर्यँत मजल मारून भारतीय गोलंदाजी पहिल्या डावात तरी बोथट ठरवली आहे. या विशाल धावसंख्येला उत्तर देताना कर्णधार रोहित आणि शुभमन गील या भारतीय जोडीने आजची शेवटची दहा षटके खेळून काढताना बिनबाद 36 धावा काढल्या आहेत.

विवेक कुलकर्णी

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया
पहिला डाव सर्वबाद 480
ख्वाजा 180,ग्रीन 114,लायन 34 ,मर्फी 41
अश्विन 91/6,शमी 134/2,अक्षर 47/1,जडेजा 89/1
भारत
पहिला डाव
बिनबाद 36
रोहित नाबाद 17  गील नाबाद 18

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.