IND vs AUS : रोहित, जडेजा आणि अक्षरमुळे भारतीय संघ मजबूत अवस्थेत

एमपीसी न्यूज : कर्णधार रोहितने जबरदस्त खेळी करत केलेले वैयक्तिक 9 वे तर कर्णधार म्हणून केलेल्या पहिल्या शतकाच्या खेळीला अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलने दिलेल्या उत्तम साथीमुळे काहीशा संकटात सापडलेल्या भारतीय संघाला जणू नवसंजीवनीच मिळाली, (IND vs AUS) त्यामुळे भारतीय संघ आज दुसऱ्या दिवसाखेर 144 धावांची मोठी आघाडी मिळवून आपले वर्चस्व कायम ठेवण्यात बऱ्यापैकी यशस्वी ठरला आहे. आजच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात 7 गडी गमावून 321 धावा केल्या आहेत,ज्यामुळे भारतीय संघाकडे 144 धावांची महत्वपूर्ण आघाडी आहे.

कालच्या एक बाद 77 वरून आज पुढे खेळ सुरू करताना कर्णधार रोहित आणि रवीचंद्रन अश्विन या कालच्या नाबाद जोडीने आजही दमदार सुरुवात करुन दिली.रोहित तर कालपासूनच उत्तम लयीत दिसत होताच,त्याला अश्विननेही उत्तम साथ देत आपली नाईट वॉचमनची भूमिका यथार्थ पार पाडली. या जोडीने बघताबघता 42 धावांची बहुमूल्य भागीदारी जोडताना पॅट कमिन्सच्या तोंडचे पाणी पळवले होते. ही जोडी तापदायक ठरते की काय असे वाटत असतानाच पदार्पण करणाऱ्या टॉड मर्फीने अश्विनला 23 धावांवर बाद करुन ही जोडी फोडली.पण पायचीत होण्याआधी अश्विनने आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली होती,मात्र त्यानंतर आलेला भरवशाचा पूजारा ,मर्फीच्या एका वाईड चेंडूवर  एक अतिशय खराब फटका मारून बाद झाला अन भारतीय संघाला मोठा धक्का बसला.

यानंतर खेळायला आला तो विराट कोहली. मागील काही सामन्यात त्याने त्याच्या त्या चिरपरिचित अंदाजात केलेल्या फलंदाजीमुळे आज तो कसोटीतही शतकाचा दुष्काळ संपवेल अशी आशा त्याच्यासह त्याच्या असंख्य चाहत्यांना होती. कोहलीने सुरुवातही झोकात केली आणि उपहारापर्यंत आपली विकेट शाबूत ठेवून संघाला दिलासाही दिला मात्र ही आशा काही फलद्रुप झाली नाही. उपहारानंतरच्या पहिल्या षटकातल्या पहिल्याच चेंडूवर त्याने मर्फीच्या आणखी एका खराब चेंडूची हकनाक छेड काढली आणि यष्टीरक्षणक  कॅरीच्या हातात चेंडू निसटून सुद्धा दुसऱ्या प्रयत्नात आरामात विसावला आणि तमाम चाहत्यांची पुन्हा एकदा घोर निराशा झाली.

त्यानंतर आलेल्या आणि पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार मारुन सुरुवात तरी भारी केली होती, पण तोही आपल्या पहिल्या कसोटीत विशेष काही कामगिरी करण्यात यशस्वी ठरला नाही आणि केवळ 8 धावा काढून नॅथन लायनची पहिला शिकार ठरला.(IND vs AUS) यावेळी भारतीय संघाची धावसंख्या पाच बाद 168 अशी झाली होती आणि ऑस्ट्रेलियन संघ सामन्यात वापस आलाय असे खात्रीने म्हणावे अशी परिस्थितीही निर्माण झाली होती. हेच कसोटी क्रिकेटच खास वैशिष्ट्य आहे.येथे खेळ कधी कसा बदलेल हे कोणालाही सांगता येत नाही, म्हणूनच तर आजही फास्ट आणि इन्स्टंट अशा काळातही कसोटी क्रिकेट टिकून आहे.ही अनिश्चितताच क्रिकेटरसिकांना मंत्रमुग्ध करत असते.

Bhosari News : हातगाडी लावल्याच्या किरकोळ कारणावरून एकास बेदम मारहाण

सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ वापस आलाय असे वाटत असतानाच  कर्णधार रोहितने अष्टपैलू जडेजाला सोबत घेऊन संघाची वादळात सापडलेली नौका सुखरूप तीरावर पोहचवली.रोहितने आपल्या आक्रमक खेळाला वेसन घालत जडेजाच्या साथीने डाव सावरताना कर्णधार कसा असावा याचे उत्तम उदाहरण सर्वाना दाखवले.त्याने बघताबघता आपले शतक पूर्ण करून संघाला आघाडी मिळवून दिली. हे रोहितचे एकूण 9 वे तर कर्णधार म्हणून पहिलेच शतक आहे,तर ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध सुद्धा त्याचे हे पहिलेच शतक ठरले. याचसोबत त्याने तिन्ही फॉरमॅट मध्ये शतक झळकावून अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार हा बहुमानही पटकावला.त्याने जडेजा सोबत सहाव्या गड्यासाठी 61 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करून संघाला सुस्थितीतही आणले.

शतक झाल्यानंतर तो मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच दुसऱ्या नव्या चेंडुवर तो पॅट कमिन्सच्या सुंदर चेंडूवर चकला आणि त्रिफळाबाद झाला.त्याच्या जागी आलेल्या श्रीकर भरतने सुरुवात चांगली केली होती, पण तो केवळ 8 धावाच करु शकला,त्याला मर्फीने पायचीत करुन आपला पाचवा बळी मिळवून आपले पदार्पण अविस्मरणीय केले.  मर्फीने पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात पाच बळी घेतले.

या आधी अशी कामगिरी जेसन क्रेझाने याच मैदानावर केली होती.त्यानंतर आलेल्या अक्षर पटेलने जम बसलेल्या रवींद्र जडेजाला उत्तम साथ देताना उर्वरित खेळात ऑस्ट्रेलियन संघाला यश तर मिळू दिले नाहीच,पण जडेजा सोबत 81 धावांची नाबाद भागीदारी करून संघाला 144 धावांची मोठी आणि खूप महत्वपूर्ण अशी आघाडीही मिळवून दिली. याचदरम्यान जडेजाने आपले 18 वे अर्धशतक पूर्ण करताना अष्टपैलूत्व सिद्ध  केले. (IND vs AUS) एकाच कसोटीत पाच बळी आणि अर्ध शतक अशी खास कामगिरी त्याने 6 व्यांदा केली आहे. अक्षर पटेलनेही त्याला उत्तम साथ देत आजच्या दिवसाचा खेळ संपण्याआधी आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले.

आजचा खेळ समाप्त झाला तेंव्हा जडेजा 66 तर अक्षर 52 धावा काढून नाबाद आहेत. या जोडीने केलेल्या जोरदार खेळीमुळे भारतीय संघ पुन्हा एकदा सामन्यात मजबूत स्थितीत दिसत आहे.या खेळपट्टीचे स्वरूप बघता सामना उद्या किंवा फारफार तर चौथ्याच दिवशी निकाल देणार हे स्पष्ट होत आहेच,त्यामुळे ही आघाडी फार मोलाची ठरणार हे नक्की.उद्या भारतीय संघ या आघाडीत आणखी 100 धावा जोडू शकला तर कदाचीत भारतीय संघ डावाच्या फरकाने जिंकूही शकतो, कोणी सांगावे?

आज तरी भारतीय संघ विजयाकडे वाटचाल करत आहे असेच चित्र आहे.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया सर्वबाद177
भारत 7 बाद  321
रोहित 120,जडेजा नाबाद 66 अक्षर नाबाद 52
मर्फी 82/5

विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.