Ind Vs Aus T20 Series : T20 सिरिजमध्ये भारत ऑस्ट्रेलियाला कडवे आव्हान देईल ? 

एमपीसी न्यूज – ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताला  1-2 अशी हार पत्करावी लागली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताला जाणवलेली पर्यायांची कमतरता T20 क्रिकेटमध्ये नक्कीच नाही. त्यामुळे आजपासून (शुक्रवारी) सुरू होत असलेल्या तीन T20 सिरिजमध्ये भारत ऑस्ट्रेलियाला कडवे आव्हान देईल अशी अपेक्षा आहे.

भारताकडून फलंदाजीमध्ये सलामीला शिखर धवनच्या साथीला केएल राहुल असणार हे जवळपास निश्चित आहे. ‘आयपीएल’मध्ये राहुलची फलंदाजी प्रभावी ठरली होती. फलंदाजीत कोहलीवर भिस्त आहेच. जोडीला श्रेयस अय्यरकडूनही मोठी खेळी अपेक्षित आहे. एकदिवसीय मालिकेत पहिल्या दोन लढती गमावल्यावर तिसऱ्या सामन्यात मिळालेला विजय हा T20  मालिकेपूर्वी महत्त्वपूर्ण असल्याचे कोहलीने म्हटले आहे.

गोलंदाजीत जसप्रीत बुमराकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. टी. नटराजनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय लढतीतून पदार्पणाची संधी मिळाली होती. नटराजनसह वाशिंग्टन सुंदर, दीपक चहर या युवा खेळाडूंवर गोलंदाजीची भिस्त आहे.

सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे मालिकेला मुकणार असल्याने ग्लेन मॅक्सवेलकडून फलंदाजीत फटकेबाजीची सर्वात मोठी अपेक्षा आहे. कर्णधार आरोन फिंचच्या साथीला मार्नस लबूशेन सलामीला येण्याची शक्यता आहे. मार्कस स्टॉइनिसदेखील सलामीसाठी यजमानांसमोर पर्याय आहे. मात्र, एकदिवसीय मालिकेत झालेल्या दुखापतीमुळे सलामीला स्टॉइनिसला पाठवण्यात येण्याची शक्यता कमी आहे. गोलंदाजांमध्ये पॅट कमिन्सला दोन एकदिवसीय लढतीनंतरच विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, आर्सी शॉर्ट, अ‍ॅडम झम्पा याच्यावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची मदार असणार आहे.

एकदंरित दोन्ही टिम मजबूत असताना एकमेकांना विजयासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. शेवटचा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर विजयाची मालिका पुढेही सुरू ठेवण्यासाठी टिम इंडिया प्रयत्नशील असेल एवढं नक्की.

असे आहेत संघ – 

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), सीन अ‍ॅबॉट, अ‍ॅश्टन अ‍ॅगर, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमेरुन ग्रीन, जोश हेझलवूड, मोझेस हेन्रिक्स, मार्नस लबूशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, केन रिचर्ड्सन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, आर्सी शॉर्ट, अ‍ॅडम झम्पा.

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी. नटराजन

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.