Pimpri : टाटा मोटर्सच्या 1500 व्या जीएस 800 सफारी स्टॉर्मचा भारतीय सेनेत प्रवेश

एमपीसी न्यूज – मेक इन इंडिया मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या वचनाला जागून, टाटा मोटर्स कंपनीने भारतीय सशस्त्र सैन्यदलासाठीच्या आपल्या 1500 व्या जीएस 800 (जनरल सर्व्हिस 800) सफारी स्टॉर्म चार बाय चार या गाडीचा सैन्यदलात प्रवेश घडवून आणला. भारत सरकारच्या संरक्षण विभागाचे एमओएस डॉ. सुभाष भामरे यांच्यासह टाटा मोटर्सच्या सरकारी व्यापार व संरक्षण विभागाचे, उपाध्यक्ष वर्मन नोरोन्हा यांनी पुणे प्रकल्पात समारंभपूर्वक हे वाहन सेनादलाच्या हवाली केले. यावेळी आणखी 3192 सफारी स्टॉर्म गाड्या सेनादलाला पुरवण्याची मागणी कंपनीकडे करण्यात आली असून यातील 1300 हून अधिक वाहनांची ‘डिलीव्हरी’ यापूर्वीच करण्यात आली आहे.  

सफारी स्टॉर्म जीएस 800 च्या अत्याधुनिक, विश्वसनीय आणि अभ्यासपूर्ण डिझेल एसयूव्ही फिचर्समुळे तसेच, 800 किलोंच्या याच्या किमान वहनक्षमतेमुळे भारतीय सैन्यदलाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठीच ही गाडी तयार करण्यात आली आहे, याची निश्चिती होते. देशातील विविध भागांत या वाहनाची जवळजवळ पंधरा महिने कसोशीने चाचणी करण्यात आली असून यावेळी या गाडीने अत्युत्कृष्ट परफॉर्मन्स करून दाखवला आहे. ऑन-रोड आणि ऑफ-रोड भागांतही ही गाडी उत्तमरित्या धावते. 60 टक्के पेलोड, 70 टक्के ऊर्जा आणि 200 टक्क्यांहून अधिक टॉर्क असलेली ही गाडी उंच-सखल भागांत, बर्फाळ प्रदेशात, वाळवंटात तसेच, जंगलातही कोणत्याही परिस्थितीत सुरळीत चालवता येते.

1500 व्या टाटा जीएस 800 सफारी स्टॉर्मच्या सैनादलातील प्रवेशाबाबत बोलताना टाटा मोटर्स लिमिटेडच्या सरकारी व्यापार आणि संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष वर्मन नोरोन्हा म्हणाले, भारतीय सेनादलाने आम्हाला ऑर्डर केलेल्या 3192 जीएस 800 सफारी स्टॉर्म गाड्यांपैकी 1500 वी गाडी सादर करताना आम्हाला फार आनंद होतो आहे. टाटा जीएस 800 ही आधुनिक एसयूव्ही भारतीय सेना दलांच्या खास गरजा भागवण्यासाठीच तयार करण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षा दलांनी टाटा मोटर्सवर ठेवलेला हा विश्वास हे देशाच्या सीमाभागाच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्याचे आव्हान पेलण्याची आमची प्रेरणा आणि आमची सेवावृत्ती यांचेच प्रतिक आहे. 1500 व्या सफारी स्टॉर्मचा सेना दलातला प्रवेश हे आमच्या कर्मचा-यांच्या निष्ठेचेच प्रतिबिंब असून यातून भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेप्रति असलेली आमची प्रतिबद्धता दिसून येते.

टाटा जीएस 800 सफारी स्टॉर्म या गाडीत एबीएस, रिकव्हरी हूक्स, जेरी कॅन आणि फॉग लॅम्प्स ही वैशिष्ट्ये देण्यात आली असून सैन्याच्या युद्धादरम्यानच्या सर्व गरजा यातून पूर्ण होऊ शकतात. याच्या देखभालीसाठीही अत्यंत कमी पैसा गरजेचा असून याला बकेट सीट्स, मोबाईल चार्जिंग पॉईंट, एसी, हिटिंग, पॉवर विण्डोज, डिमिस्टिंग या फिचर्ससह सहा जण आरामात बसू शकतील इतकी ऐसपैस जागा देण्यात आली आहे.

1958 सालापासून टाटा मोटर्स ही कंपनी देशाच्या ऑफ-रोड सुरक्षा दलांना सेवा पुरवत असून आजवर भारतीय लष्कर व संसदीय दलांमध्ये कंपनीच्या 1.5 लाखांहून अधिक वाहनांचा पुरवठा करण्यात आला आहे. केवळ स्थानिक बाजारपेठेच्या गरजा भागवण्यासाठी कंपनी उत्पादने व सेवा पुरवत नसून, जगभरातील बाजारपेठांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी सतत प्रयत्नशील असते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.