हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि आपले चित्रपट (लेखांक शेवटचा )

(सतीश वैद्य)

एमपीसी न्यूज- मागच्या लेखात नृत्य या विषयावर बऱ्यापैकी चर्चा झाली. आता किती संगीतकारानी हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपलं योगदान दिले आहे ते पाहू. मला जवळपास 45 नावं आठवली. लोकप्रियतेच्या दृष्टीने आणि फॅन्स व फॅन्सक्लब यांच्या आकडेवारीनुसार तसेच मोठे अवॉर्ड मिळविलेले असलेल्यांना ग्रेड द्यायचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर बिनाका गीतमाला ह्या रेडिओ सिलोनवरील भन्नाट लोकप्रिय कार्यक्रमातून ऐकवल्या जाणाऱ्या प्रथम तीन पायदान वरील गाण्यांचा रेकॉर्ड पाहून सिनेसंगीतातून शास्त्रीय संगीत कसं साफ सोपं केलं गेलं आणि वेस्टर्न म्युझिक इलेक्ट्रॉनिक वाद्य यांच्या प्रभावाखाली बदलत गेलं ते पाहता येईल.

1950 ते 1970-75 पर्यंतचा काळ हा सिनेसृष्टी व सिनेसंगीताचा सोनेरी काळ गोल्डन इरा होता. इतकी वर्ष झाली तरी ही त्या काळात जी काही गाणी तयार केली होती तीच आजही सदाबहार नगमे, भुलेबीसरे गीत ,रिट्रो ,लिजँट्स ऑफ अमुक अमुक, गोल्डन इरा,वगैरे वगैरे नावानं टीव्हीच्या म्युझिक चॅनेल्सवर आपण ऐकतो. लोकांना पण तीच गाणी व संगीत अजून आवडते आणि कायमचं लक्षात आहे. म्हणून मी तो काळ नजरेसमोर ठेवून तसा उहापोह, विचार केला आहे.

जास्तीतजास्त लोकप्रिय संगीतकार_9 नावं… एस डी बर्मन, आर डी बर्मन, शंकर जयकिशन, अनिल विश्वास,नौशाद, रोशन ,ओ पी नय्यर, सलील चौधरी, चित्रगुप्त, एस एन त्रिपाठी.

या सर्वांपेक्षा थोडं कमी लोकप्रियता लाभलेले. (हे सगळं सापेक्ष आहे. फरक असू शकतो. निकष बदलले तर वेगळे परिणाम दिसू शकतात)—
मदन मोहन, रवि, सी रामचंद्र, स्नेहल भाटकर, खय्याम, हेमंतकुमार,सज्जाद हुसेन, जयदेव,वसंत देसाई, कल्याणजी आनंदजी,लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्या

नंतर तुरळक मोजकेच सिनेमे केलेले संगीतकार….

रविशंकर, शिवहरि, अल्लारखां अर्थात ए आर कुरेशी, अकबर अली खान,इकबाल कुरईशी, जी एस कोहली, सतीश भाटिया, रामलाल, वनराज भाटिया, आदी नारायणराव, एन दत्ता म्हणजे दत्ता नाईक, सुधीर फडके, उषा खन्ना, हंसराज बहल, दत्ताराम वाडकर (दत्ताराम हे उत्कृष्ठ ढोलक वादक,त्यांच्या एका खास ठेक्यासाठी,”दत्तू ठेका”साठी प्रसिद्ध होते) किशोर कुमार, सोनिक ओमी, सपन जगमोहन, रवींद्र जैन, सी अर्जुन, उत्तमसिंग,……
ह्या सर्व संगीत दिग्दर्शक मंडळींकडे गायक किती ? तर हाताच्या बोटावर मोजता येतील असे.ल ता,आशा,रफी, मुकेश, तलत,महेंद्र कपुर,किशोर कुमार,सुमन कल्याणपूर, गीता दत्त, व बाकी विशेष?

सर्व जण जीव ओतुन, मनापासून, संगीतातील आनंदासाठी काम करायचे. म्हणूनच अप्रतिम अजरामर, कधीही न विसरू शकणार संगीत करून गेले. आणि मला वाटतं ते इतक्या उंचीवर नेउन ठेवलय न की त्या नंतर त्यांनी नविन असं करण्यासाठी काही शिल्लकच ठेवलं नाही.म्हणजे साधारण1980-85 नंतर!त्या आधी स्पर्धा होती पण अधिकाधिक चांगलं करण्याची! एकमेकांशी भांडणं, वाद न घालता उलट सहकार्य करीत असत.

या वर एक किस्सा पंचम दा नी सांगितला होता तो आठवला ….रोशन एकदा एस डी बर्मन याना भेटायला गेला होता, हे सांगायला की “दादा मैने आपका गाना “ठन्डइ हवाये लहारते आये” इसके मिटरपर एक गाना बनाया है.” रहे ना रहे हम “मेरी फिल्म ममता के लिये.(मीटर म्हणजे छंद) सूर थोडे अलग.”तर ते म्हणाले” कोई बात नहीं.मिटरपर मेरा कोई हक नही है. तुम बना सकते हो”.पंचमने त्या वेळी असही म्हटलं होतं की त्यानंतर आम्हीपण काही जुन्या गाण्यांच्या मीटरवर अनेक गाणी बनवायचो..” सागर किनारे दिल ये पुकारे” हे गाणं त्यानं स्वतः त्याच, रहे ना रहे हम च्या, मीटरमध्ये रचलय. कॉमन माणसाला ते काही कळत नाही. आर डी म्हणजे पंचमच्या संगीताबद्दल तर बरंच लिहिता येईल.असो.बर्मन पिता पुत्र……खरं म्हणजे त्यांचे आडनाव होतं देवबर्मन. सचिन देवबर्मन यांचा जन्म भारताच्या ईशान्येकडील त्रिपुरा जवळ dhakkaपासून 100 किलोमीटरवरील एका गावात 1906 मध्ये झाला होता.

ईशान्य दिशा ही आपण देवाचं स्थान मानतो.खरंच ! हा देवच तिथं जन्माला आला. आणि आपणासर्वाना खूप मोठ्ठ दान, देणं देऊन गेला. पुत्रही बापसे बेटा सवाई निपजला. ह्या बर्मन पितापुत्रांच्या वागण्या बोलण्यातील साधेपणा आणि इनोसंस बद्दल अनेक गोष्टी आहेत.सचिनदादा तर कायमच गाण्यात गुंगलेले, तंद्रीत,नवीन कंपोझिशनच्या विचारात असायचे..क्रिकेट मध्ये सचिनला राहुल बाप मानायचा, तसा तो होताही. इथे हे बापलेक रक्ताच्या नात्यानं होते. सचिन पिळगावकर, सचिन खेडेकर .आणखीही वेगवेगळ्या क्षेत्रात सचिन असतील.त्या नावातच जादू आहे.असो.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर दोनएक वर्षांत थोडं स्थिरावल्यावर नवचैतन्याचा लोकांमध्ये संचार सुरू झाला.चित्रपटसृष्टी ही मुंबईत विविध प्रांतांतून येणाऱ्या कलाकारांनी गजबाजायला लागली होती. समग्र जनता आता मनोरंजनासाठी आतुर झाली होती. एक एक उच्च प्रतिभेच्या कलाकारांच्या कडून सिनेमे तसच संगीताचा आस्वाद, आनंद घेण्यास आतुर झाली होती. रेडिओ हेच एक माध्यम होते.आणि 1952 मध्ये अमीन सयानी नावाचा,रेडिओ साठी लागणारा योग्य आवाज, साधारण माणसाला कळेल अशी हिंदी, स्पष्ट बोलणं व आपलं काम मेहनतीने परिपूर्ण करणारा युवक रेडिओ सिलोनवर एक संस्मरणीय कार्यक्रम घेवून आला

“बिनाका गीतमाला”

3 डिसेंबर1952, बुधवार रोजी रात्री 8 ते 8. 30 या वेळेत एक प्रयोग म्हणून सुरू झालेला कार्यक्रम, विक्रमी उत्साहाने अविरत 41 वर्षं चालला व देशभरातल्या रसिकांना, संगीतप्रेमींना त्यांच्या भावविश्वाशी गाण्याचं नातं आपसूक जोडण्याची कला शिकवून गेला.कार्यक्रमाच्या सुरवातीला बिगूल ह्या वाद्यांत खास सिंगनेचर ट्यून वाजायची.ही ट्यून अमीन भाईंनी “आसमान”या ओ पी नय्यर यांच्या पहिल्या चित्रपटातील एक गाण्याची इन्ट्रो म्युझिक होते. ती उचलली होती.गीता दत्तच गाणं. पुढे 1970साली ती ट्यून बदलली. पहिल्या वर्षी 12 गाणी वाजली 30 डिसेंबर1953 ला. बिनाकाच्या ,त्यांच्या सर्वेक्षण पध्दतीप्रमाणे सर्वात लोकप्रिय व गाजलेली 3 गाणी–”मोहब्बत की दासतां आज सुनो”-मयुरपंख-लता-शंकर जयकिशन.”शाम ए गम की कसम”-फूटपाथ-तलत-खय्याम- “ये जिंदगी उसी की है”-अनारकली- लता-सी रामचंद्र-.यापैकी” ये जिंदगी” हे भीमपलास रागावर आधारित शारदा या मराठी नाटकातील “मूर्तिमंत भीती उभी मजसमोर राहिली”ह्या पदाची छाया असलेलं गीत 65 वर्षे झाली तरीही अवीट आहे.

हे सर्वाधिक लोकप्रिय म्हणून 1953 साली नंबर एक. 1954 साली सिबा गायगी लि कंपनीला,जी बेसिकली बिनाका टूथपेस्ट बनवणारी,लोकांच्या पसंतीच्या गाण्यांसाठी,लोकांनी पाठवलेल्या पत्रांची छाननी करण्यासाठी एक स्वतंत्र सेल उघडावा लागला. लोकप्रियतेनुसार 16 गाणी ऐकविली जाऊ लागली. या वर्षी उषा मंगेशकर व सुमन हेमाडी(कल्याणपूर) ही दोन रत्न आपल्याला लाभली.ओ.पी.च पुनरागमन आणि हिट “आरपार”!!!बिनाका–टॉप तीन गाणी” ये लो मै हारी पिया”गीता-ओ.पी.नय्यर–आरपार .–”मन डोले मेरा तन डोले”लता-हेमंत कुमार-नागिन—-” जाये तो जाये कहाँ”-तलत- एस डी बर्मन.–टॅक्सी ड्राइवर

ही सगळी माहिती आणि ह्या पुढील1955 ते 1971 पर्यंतचा टॉप 3 गाण्यांचा रेकॉर्ड मला दर्दी रसिक असलेल्या एका मासिकाच्या माध्यमातून मिळाला आहे त्या बद्दल त्याची कृतज्ञता.

तर….1954ला सिबा गायगी कंपनीने बिनाकाच्या स्वतंत्र सेल मध्ये येणाऱ्या शेकडो पत्रांची दखल घेऊन पुढे तब्बल 39 वर्ष ती प्रथा चालू ठेवली व सिनेसंगीत रसिकांना आनंदाची पर्वणी दिली. हृदयाचा ठाव घेणारे शब्द, अर्थवाही चाल असलेली श्रवणीय गाणी,तरुण मनाला भुरळ घालणारी गाणी,तरुणाई त्याच्या आवडीच्या क्रमानुसार अमिनभाईना पत्रान कळवीत आणि त्यानुसार कोणतं गाणं किती पॉप्युलर आहे हे ठरवलं जायचं. एस.एम.एस.नव्हते,मोबाइल नव्हते तरी देशातील रसिक आपल्या भावना व्यक्त करीत. असो. आज त्यावेळचं तारुण्य सांजपर्वात आहे. ते काही असलं तरी ती बिनाकातली अजरामर गीते आजच्या तरुणांनाही आवडतात व टिव्ही वरील स्पर्धांमध्ये तीच गाणी बऱ्यापैकी म्हटली जातात हे आपण पाहतो.

आता 55 पासून पुढली दर वर्षीची टॉप थ्री गाणी पाहू. 1955” मन डोले”… नागिन सतत दोन वर्षे गाजलेलं वाजलेलं. त्यातली बीन म्हणजे कल्याणजीनी वाजवलेलं क्ले व्हायोलिन- लता- हेमंत कुमार.
“मेरा सलाम लेजा” उडन खटोला -लता -नौशाद.
सर्वाधिक लोकप्रिय” मेरा जुता है जापानी”श्री420-मुकेश-शंकर जयकिशन.
1956….”तू प्यारका सागर है”-सीमा- मन्ना डे-एस जे.
“नैन सो नैन नाही मिलाओ”- झनक झनक- लता हेमंत कुमार-वसंत देसाई.
“ ऐ दिल है मुश्कील”- सी आई डी -रफी–ओ पी नय्यर.

1957…बिनकाच्या वार्षिक कार्यक्रमात खूप चढाओढीमुळे तो दोन भागात करावा लागला व 18आणि 25 डिसेंबर1957 ला 34 गाणी ऐकविली गेली.बिनाका स्टाईलने!सर्वाधिक लोकप्रिय सगळ्यात शेवटी—

57 ची टॉप थ्री “लाल लाल गाल” मि. एक्स- रफी- एन.दत्ता. “सरजो तेरा चक्राए”प्यासा-रफी–एस डी बर्मन- आणि प्रचंड लोकप्रियता मिळवलेलं टॉप नं 1” जरा सामने तो आवो छलीये” जनम जनमके फेरे- लता रफी- एस एन त्रिपाठी.

1958 टॉप 3…”.बोल री कठपुतली डोरी”-कठपुतली -लता- एस जे….कठपुतली,वैजयंतीमालाच्या नृत्यामुळं खूप गाजला. “सिएटी कॅट”- दिल्लीका ठग-आशा किशोर-रवि…..आणि…..

टॉप नं 1”है अपना दिल तो आवरा”- सोलवा साल-हेमंतकुमार -एस डी बर्मन…देव आनन्द वहिदा,जॉनी वॉकर, आणि पंचमने वाजवलेला माऊथ ऑर्गनचा पीस,जबरदस्त!शिवाय मुंबईच्या जुन्या लाकडी,वजनदार ,हवेशीर,मजबूत लोकलमधलं शुटींग. बिनाका 5वर्षांची झाली. बुधवारी सारे लक्ष संध्याकाळी आठ कधी वाजतायत इकडे असायचे.16,18,20 वयाच्या तरुण मंडळींमध्ये टॉप गीतांवर चर्चा असायची. कधीकधी साध्या पैजा लागायच्या.

1959….स्वतंत्र भारताचे वय 12 वर्ष झालं. नवनिर्मिती बऱ्यापैकी होत होती. “बिनाका” रेडिओ सिलोनच्या व्यापार विभागातून जरी प्रसावीत होत असला,तरी अमीन सयानी सेसिल कोर्ट,लांन्सडाऊन रोड,मुंबई1.या आपल्या कार्यालयातूनच कार्यक्रम तयार करायचे.
1959…..23 आणि30 डिसेंबर या शेवटच्या दोन बुधवारी 17 आणि 15 गाणी सादर झाली.
टॉप 3 होती— “सबकुछ सिखा हमने”-अनाडी-मुकेश-एस जे.राज कपूर ला 1960च बेस्ट ऍक्टर च फिल्म फेअर अवॉर्ड मिळालं अनाडी साठी!
“ मुझको यारो माफ करना मैं नशेमें हूं”मुकेश- एस जे. सर्वाधीक लोकप्रिय,जरी 58 सालच असलं तरी “हाल कैसा है जनाबका”चलतीका नाम गाडी”-आशा किशोर-एस डी बर्मन 1960 या क्षेत्रात आणखी एक महिला संगीतकार उषा खन्ना यांचं पदार्पण.” दिल देके देखो”रफी आशाची सुपरहिट लाईट गाणी.पहिली महिला संगीतकार कोण ? सरस्वती राणे ! 1937 साली अछूत कन्या हा त्यांचा चित्रपट उत्कृष्ठ गाणी अशोककुमार देवीकाराणी!!देविका राणी,एक गायिका नायिका. त्या काळातील बऱ्यापैकी नावाजलेल्या अभिनेत्रीवरून आठवलं.भारतीय सिनेमात पहिला किसिंग सीन 1933 साली आलेल्या “कर्म”या सिनेमात हिमांशू रॉय आणि देविकाराणी यांनी दिला होता. सिनेमाच्या शेवटी अगदी “द एन्ड”दाखवायच्या आधी. पण खरं म्हणजे त्या आधी मूक पटात” A throw of dice”1929 मध्ये चारू रॉय आणि सेता देवी यांनी लीप लॉकिंग सिन दिला होता !!! बॅकग्राऊंड म्युझिक होतं साथीला आणि इंग्रजीत सब टायटल्स !तोपर्यंत सेन्सॉर बोर्ड अस्तित्वात यायचं होतं. भारत, आपला देश पारतंत्र्यात होता. या दोन्ही सीन्सच्या क्लिप्स यू ट्यूब वर दिसतात.असो.जुने संगीतकार थोडं पिछे हटत होते नवीन नवीन येत होते पण गायक मंडळी बऱ्याच अंशी तीच होती.

1960…टॉप 3…..”मुझको इस रातकी तन्हाईमे- दिलभी तेरा हम भी तेरे-मुकेश-आणि लता- कल्याणजी आनंदजी-. हे गाणं duet नव्हतं! त्यासुमारास सेम गाणं सोलो, पण दोन वेगवेगळ्या सिच्युएशन साठी वेगळवेगळ रेकॉर्ड करून व चित्रीकरण करून सिनेमात दाखवायचा ट्रेंड सुरू झाला होता.एकदा मेल व्हॉइस आणि एकदा फिमेल व्हॉईसमध्ये! हा प्रकार लोकांना फार आवडला.1960पासून पुढे पन्नास वर्षे राज्य करणारा आपल्या सगळ्यांचा आवडता हिरो धर्मेंद्र च पदार्पण याच सिनेमातून झालं !!!

दुसरं…”चौदहवि का चांद हो” रफी -रवि। “जिंदगीभर नही भुलेगी” बरसातकी रात-रफी-रोशन. हे नं.एक! 1961–टॉप 3– “हो मैने प्यार किया’-जिस देशमे गंगा बहती है”लता-एस जे .”अभी न जाओ छोडकर”- हम दोनो-आशा रफी-जयदेव-. व टॉप नं.1 वर ‘तेरी प्यारी प्यारी सुरतको”-ससुराल-रफी-एस जे.
आम्ही बारा पंधरा वर्षाचे असू. तेव्हा ‘प्यार किया तो डरना क्या” किंवा ‘तेरी प्यारी प्यारी सुरतको’ असली गाणी म्हणायला घरच्यांची परवानगी नसायची. शाळेतून पण नसायची.असो.

1962 ह्या वर्षी सर्वच संगीतकारांनी जबरदस्त गाणी दिली.शंकर जयकिशननी तर अनेक चित्रपट.उदा.आशिक,जब प्यार किसींसे होता है,हरियली और रास्ता,जंगली,रंगोली,रुपकी रानी चोरोंका राजा,अश्या अनेक सिनेमात सुपर हिट संगीत दिले.टॉप 3 मध्ये न येता खूप लोकप्रियता लाभलेली 2 गाणी. “कही दीप जले कही दिल”- बिस साल बाद- लता- हेमंतकुमार …”आपकी नजरोने समझा प्यारके काबिल मुझे”-अनपढ- लता- मदन मोहन…
टॉप 3 “अब क्या मिसाल दू “-आरती- रफी-रोशन.हे गीत उर्दू शायरी साठी फार गाजलं!मोहम्मद रफी तर काय उर्दूवर मास्टरी असलेले! धून,साज,और आवाज अफलातून!

“दो हंसोका जोडा”-गंगा जमना- रफी-नौशाद.भोजपुरी (भय्याभाषा) सर्व गाणी हिट.दिलीपकुमार वैजयंतीमाला.मागच्या वर्षी 1961 चं फिल्मफेअर अवोर्ड बेस्ट ऍक्टर..दिलीपकुमार ला कोहिनूर साठी मिळालं होतं. यंदा 1962 चं अटीतटीच्या स्पर्धेत राज कपूर जिस देशमे साठी घेऊन गेला.
“ऐहेसान तेरा होगा मुझपर”लता आणि रफी सोलो-duet नाही. एस जे.. यमन कल्याण राग.सिनेमात काश्मीरमधील श्युटिंग,रंगीत सिनसिनरी जास्त दिसू लागली. ब्लॅक अँड व्हाईट चा जमाना संपला नव्हता. काश्मिरी वातावरणात सायरा बानूचं पदार्पण!
1963 लक्ष्मीकांत प्यारेलाल,महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर ही नावं चमकली याच वर्षी!
63 साली 32 सॉलिड हिट गाण्यांच्या अटीतटीच्या स्पर्धेमुळे शेवटच्या कार्यक्रमाला 1 जानेवारी 1964 चा दिवस उजाडला.
टॉप 3 “इन हवाओमे इन फिजाओमे” गुमराह-आशा महेंद्र कपुर -रवि…रविने या एका वर्षात13 सिनेमांना संगीत दिलं होतं! “जाने वाले कभी नहीं आते”दिल एक मंदिर-रफी सुमन-एस जे. सर्वात टॉप “जो वादा कीया वो निभाना पडेगा” लता रफी-ताजमहल -रोशन तब्बल तीन पिढ्याना उत्तम संगीतकार म्हणून माहिती असलेले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं स्वतन्त्र संगीत दिग्दर्शक म्हणून आगमन,फिल्म पारसमणी तून जोरदार पदार्पण 1963 मध्येच!!!!
1964 “मेरे मेहबूब ‘टायटल सॉंग- रफी नौशाद -लता नौशाद. “ये मेरा प्रेमपत्र पढकर”- संगम -रफी-एस जे.“मेरे मनकी गंगा”-संगम-मुकेश- एस जे.
ह्या वर्षी आणखी एक गाणं खूप लोकप्रिय होत. नं.वनच्या बरोबरीच !!”चाहुंगा मैं तुझे “दोस्ती -रफी -लक्ष्मी प्यारे …..दोस्ती हा ब्लॅक अँड व्हाईट सुपरहिट.सर्वच गाणी सॉलिड…

1965 टॉप 3 “ ज्योतसे ज्योत जगाते चलो”- संत ज्ञानेश्वर-लता आणि मुकेश- सोलो -duet नाही.राग भैरवी.लक्ष्मी प्यारे. “आवो ट्विस्ट करें”-भूत बंगला- मन्ना डे-आर डी बर्मन.“जिस दिलमे बस था प्यार तेरा”-सहेली- मुकेश-कल्याणजी आनंदजी. तरीहि दीड वर्ष सतत गाजलेलं “चाहुंगा मैं तुझे सांजसवेरे”-दोस्ती- रफी-लक्ष्मी प्यारे -एक झलक म्हणून वाजवले गेले.राग पहाडी,(पहाडी धून) 1966 याच वर्षी 32 गीतांपैकी शेवटचं, अंतिम पायदान वरच्या गाण्याला,” सरताज गीत” असं म्हणणं सुरू झालं.
ओ पी नय्यरची गाणी सुरेल असूनही 62 सालापासून टॉप 3 मध्ये येता येता मागे राहत होती. या वर्षी एक गाणं आलं. “हुजुरेवाला जो हो इजाजत” ये रात फिर न आयेगी-आशा मिनू पुरुषोत्तम. दुसरं। “गाता रहे मेरा दिल”- गाईड- लता किशोर- एस डी बर्मन.गाईडमध्ये उत्कृष्ट अभिनयाचे फिल्मफेअर अवोर्ड देव आनंदला 67 साली दिलं गेलं. आणि सरताज “बहारो फुल बरसाओ”- सूरज-रफी-एस जे.1967 या वर्षांपासून लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्या जोडीनं बिनाका गितमाला मध्ये 32 गीतांपैकी दर वर्षी सातआठ गाण्यांना जागा मिळवून 1971 पर्यंत सतत 5 वर्ष हा वेगळा रेकॉर्ड केला शिवाय टॉप थ्रीत एक तरी गाणं असायचंच!!!

स्वतंत्र भारत वीस वर्षाचा झाला. आपली चित्रपट सृष्टी नवनवीन कलाकारांनी बहरली होती. एक दुःखद बातमी आली. राज कपूरच्या टीम मधला त्याचा जुना मित्र,असामान्य प्रतिभावंत, गीतकार शैलेंद्रने निरोप घेतला होता. तसंच आणखी एक मोठा धक्का बसला होता तो म्हणजे एक अतिशय लोकप्रिय प्रतिभावंत संगीतकार रोशन फक्त पन्नासाव्या वर्षीच निधन पावला.पण ताज्या दमाची नवीन मंडळी येत होती. टॉप 3… “बहारो मेरा जीवन भी सवारो” आखरी खत-लता- खय्याम-पुन्हा एकदा राग पहाडी(पहाडी धून). खय्याम साहेबांनी याचा वापर बऱ्याच वेळा केला.अनेक गाणी बनवली या रागावर!

“ओ मेरे सोना रे”-तिसरी मंझील-आशा रफी- आर डी बर्मन.तिसरी मन्झीलसाठी देव आंनद चं नाव अगोदर पुढं होतं पण काय झालं कुणास ठाऊक शम्मी कपूरच्या हातात ती फिल्म आली.शम्मी कपूरने अनेक सिनेमे केले पण फक्त ब्रम्हचारीतील अभिनयासाठी एकदा बेस्ट ऍक्टर चं अवोर्ड 1969मध्ये घेतलं!
67 सालच टॉप नं.1 होतं” सावनका महिना पवन करे शोर”मीलन-लता मुकेश- लक्ष्मी प्यारे.नूतनला बेस्ट ऐक्ट्रेसचं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं.

1968 बिनकाच्या सोळाव्या वर्षी अमिनभाई 800 व्या कार्यक्रमाची घोषणा करत होते.यंदा पण दुसऱ्या भागाचं प्रसारण 1जानेवारी 69 ला झालं.
“निले गगनके तले”-हमराज- महेंद्र कपूर- रवि.परत पहाडी धून! “मेरे सामनेवाली खिडकीमे”- पडोसन- किशोर- आर डी बर्मन.
“दिलविल प्यारव्यार मै क्या जानू”- शागीर्द-लता-लक्ष्मी प्यारे. लोकांची रुची बदलत असल्याचे स्पष्ट संकेत दिसत होते.

1969 यंदा 36 गाणी वाजली. वेळेअभावी काहीवेळा गीत झलक वाजत असे.शेवटची तीन टॉप….”.पराई हूं पराई “-कन्यादान-लता-एस जे.“ओहरे ताल मिले नदिके जलमे”-अनोखी रात-मुकेश-रोशन.हे गीत दोन वर्षांपूर्वी करुन ठेवलं होतं. रोशनचं शेवटचं गाणं. असो. टॉप नं.1 होतं “कैसे रहू चूप के मैने”-इंतकाम-लता-लक्ष्मी प्यारे. अभिजात संगीत लुप्त होतंय असं जाणवू लागले.

1970 33 गाणी दोन भागात ऐकविली गेली. टॉप थ्री-”रंगीला रे”-प्रेमपूजारी- एस डी बर्मन. “मेरी प्यारी बहनिया”-सच्चा झूठा- किशोर-कल्याणजी आनंदजी.
एक नं.1 सरताज गीत.”बिंदीया चमकेगी” दो रास्ते-लता-लक्ष्मी प्यारे.

1971
“ये जो मोहब्बत है”कटी पतंग-किशोर- आर डी बर्मन.
“अच्छा तो हम चलते है”आन मिलो सजना-लता किशोर- लक्ष्मी प्यारे.
“जिंदगी एक सफर है सुहाना”-अंदाज-किशोर-आशा-एस जे- हे गाणं दोन सिच्युएशन साठी वेगवेगळं सोलो होतं.

71सालानंतर पुढे 38 गाणी ऐकवली जायची.बिनाका अशीच पुढे 27 डिसेंबर93 पर्यंत चालू होती.1971च्या सरताज गीत “जिंदगी एक सफर है सुहाना ,यहा कल क्या हो किसने जाना “ह्या प्रमाणे कितीतरी गायकाना किशोर कुमार यांनी मागे टाकलं व आपलं साम्राज्य उभं केलं. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांनी चित्रपट सृष्टी गाजवायला सुरुवात केली होती. किशोर कुमार आर डी ,किशोर कुमार कल्याणजी आनंदजी मिळून खूप चांगली गाणी दिली.एल पी, आर डी,बप्पी, अन्नू, राजेश रोशन वगैरे नवे संगीतकार आले.नवीन पिढीतले रसिक तरुण श्रोते फार मोठ्या प्रमाणात वाढले होते.त्यांची आवड खूपशी बदलली होती.

आता आपण मागे वळून संगीताचा परत वेग वेगळ्या बाजूंचा विचार करूनआढावा घेऊ या. आपणांस माहित आहेच की चित्रपट निर्मिती साठी सर्वात महत्वाचे म्हणजे एक उत्तम कथानक,संहिता असणं अत्यंत आवश्यक असते. मूळ कथा ती मग धार्मिक पौराणिक ऐतिहासिक सामाजिक असू शकेल त्यावर पटकथा कथेनुरूप प्रसंग, सिच्युएशन व ती सजवण्यासाठी लोकेशन संवाद गाणं पार्श्वसंगीत बनवावं लागतं. जसं कथानक जसे प्रसंग तसं संगीत.असो.

1935पासूनचा संगीत व चित्रपट यांचा प्रवास पहिला.

संगीताशिवाय सिनेमा पूर्ण होऊच शकत नाही.गाणी व पार्श्वसंगीत त्यात अपरिहार्य आहे. पार्श्वसंगीताचा पहिला प्रयोग केला. केशवराव भोळे यांनी1937 साली प्रेसिडेंट या चित्रपटात ! 1972-73चे सुमारास “पाकिजा”साठी अर्ध गुलाम मोहंमद व अर्ध नौशाद यांनी संगीत दिले होते. त्यातील पार्श्वसंगीत फक्त नौशादनी केलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की” माझ्या मते पार्श्वसंगीत हा काही केवळ वेगवेगळ्या वाद्यांच्या आवाजाचा खेळ नाही. पण जिथे चित्रपटातील संवाद संपतो आणि कुणाही पात्राचा आवाज नसतो म्हणजेच आवाजहीन प्रसंग असतो अशा ठिकाणी पार्श्वसंगीत त्या शांततेला बोलकं करत!!”आज चित्रपट व टीव्हीमालिकातलं पार्श्वसंगीत कुठे नेऊन ठेवलंय? एक सेकंदही आवाजाशिवाय जात नाही. आनंद आहे!

प्लेबॅक चा शोध 1935सालीच “धुपछाव “या नितीन बोस दिग्दर्शित आर सी बोराल यांनी संगीत दिलेल्या सिनेमातून लागला. आर सी बोराल यांनी सर्वात प्रथम ऑर्केस्ट्रा आणला तबला पेटी, व्हायोलीनचे जोडीला सारंगी बासरी,आणि चेलो हे पाश्चिमात्य वाद्य आणलं जे तेंव्हा कोणीही वाजवू शकत नव्हते. पण बोरालनी तेव्हाचे सारंगी वादक महम्मद हुसेन यांच्याकडून उत्कृष्टपणे वाजवून घेतले. या सिनेमात पंकज मलिक यांनी पण संगीत दिले होते. बोरालनी वाद्यवृंद आणला पण त्यात हार्मनी निर्माण केली पंकज मलिकांनी!आट्रो,सेक्सोफोन,डबलबेस,आणि ऑर्गन ही वाद्ये आपल्या चित्रपटात आणली व आपण ज्याला काऊंटर मेलडी म्हणतो ती त्यांनीच प्रथम चित्रपटात आणली 1935 साली!मेंडोलीन trumpet ही वाद्ये सर्वात प्रथम अरेबियन संगीताचा वापर करताना अनिल विश्वासनी 1940मध्ये “अलिबाबा” त केला होता. नन्तर ही वाद्ये इतर वाद्यांत मिसळून अनेकांनी केला. विशेष करून शंकर जयकिशन,ओ पी नय्यर यांनी खूप केला.असो.

एखाद्या गाण्याच्या शब्दावरून सिनेमाला तसंच नाव देणं किंवा नावावरून गाणं टायटल सॉंग करणं सुरू झालं.अनेक उदाहरणे आहेत अशी.
अंगाई गीत हा प्रकार म्हणजे मुलायम आवाजात लतान गायलेलं अलबेला तल “ धिरेसे आजा री अखियनमे निंदी या आजा रे आजा” ही पहिली लोरी असा आपला समज आहे. पण मराठीत त्या आधी “अयोध्येचा राजा”या चित्रपटात गोविंदराव टेम्बेनी दुर्गा खोटे याना एक अंगाई गायला लावली होती. नंतर 40 साली पंकज मलिक यांनी अंगाई बाईंच्या मुलायम आवाजात असावी या गोष्टीला फाटा दिला आणि चक्क सहगलना” सोजा राजकुमारी सोजा”गायला लावलं! पुरुषांन म्हटलेली हिंदी सिनेमातली पहिली लोरी सहगलच्या आवाजात! हे कसं वाटतं ऐकायला?गम्मतच..…स्त्रीच्या आवाजात अनेक अंगाईगीत लोकप्रिय झाली होती पण 1967-68मध्ये ब्रह्मचारी या सिनेमात शम्मी कपूर साठी रफीनी गायलेली लोरी” मैं जागू तुम सो जाओ”आणि कुंवारा बाप मध्ये त्या नन्तर सुमारे दहा वर्षांनी सर्वत्र किशोर कुमार आणि फक्त किशोर कुमार राज्य करत होता त्यानं मेहमूद साठी “आरी आ आजा,निंदीया तू ले चल कही”राजेश रोशननी संगीतबद्ध केलेली खूप छान लोरी ऐकायला मिळाली.मुद्दामहून ह्याच लोरिंचा उल्लेख का तर ह्या दोन्हीं कलाकारांची तबीयत कुठे आणि गाणी कुठे!!तरीही शम्मी आणि मेहमूदनेअभिनय चांगलाच केला आहे.

हिंदी सिनेमात गझल हा गान प्रकार अनिल विश्वास नी 1942 साली गझल सम्राज्ञी बेगम अखतर कडून आणला. “रोटी”नन्तर बेगम अखतर यांनी सिनेमात गाणे सोडून दिलं व गझल ठुमरी गायिका म्हणूनच प्रसिध्दी मिळवली.मदनमोहन त्यांचा निस्सीम भक्त चाहता होता ज्याने अनेक गझला सादर केल्या.लता रफी तलत कडून उत्तम उत्तम गझला बनवल्या व गझलसम्राट म्हणून प्रसिद्ध झाला.

1956साली आलेल्या भाईभाई या अशोक कुमार किशोर कुमार, शामा,निरूपा रॉय असलेल्या सिनेमात मदनमोहननी “कदर जाने ना ओ कदर जाने ना” या गझले विषयी बोलताना उ.अमीर खान सारख्या तत्कालीन महान शास्त्रीय गायकांनी जाहीरपणे म्हटलं होतं “शास्त्रीय संगीतातील गायक एखादा राग तासनतास आळवून जो परिणाम साधू शकत नाही तो या लताबाईंच्या आवाजाने व मदनमोहनच्या चालीने 3 मिनिटांत साधला. इथेच चित्रपट संगीत भावसंगीत वरचढ ठरते”!!!कदर जाने ना हे बेगम अखतर यांचेही आवडते गाणे होते आणि विशेष म्हणजे त्या कधीही मदनमोहनना रात्री बेरात्री फोनवर ऐकवायला सांगायच्या आणि ते तसं ऐकवायचे.

एकाच वेळी एका गाण्यात बारा बारा सुरांचा उपयोग करून चाल बांधणे.आपल्याला शक्य वाटतं का? अस्ताई व अंतऱ्याची चांगली बंदीश बांधणारे संगीतकार शामसुंदर यांना प्रभातच्या “नई कहानी” साठी बोलावलं व त्यात असा प्रयोग केला होता.

राग भैरवीत शंकर जयकिशन यांनी 300 गाणी रचली असं म्हणतात.पण त्याआधी झेंडे खां या संगीतकारांनी या एकाच रागावर एकाच सिनेमात सात सात गाणी बांधली. केदार शर्मा व ए एस जानी यांनी संगीत नियोजन केले होते. सर्व गाणी एकसुरी होतील अशी भीती सगळ्यांना वाटत होती. पण झेंडे खान यांनी ती कल्पना सोडली नाही तर अजून सर्व गाण्यातच नाही तर पार्श्वसंगीतातही भैरवी चे स्वर वापरून कुठेही एकसुरीपणा येऊ दिला नाही. भैरवी रागातून विविध रस निर्माण करून हा एक अभिनव प्रयोग यशस्वी केला.मुख्य गायिका होती राम दुलारी!त्या काळात लोकांमध्ये संगीताची आवड व जाण बऱ्यापैकी होती. असो.

सिनेसंगीताच्या ह्या एवढ्या मोठ्या इतिहासाची उजळणी का व कशाला केली मी?नव्या जुन्या संगीतकारांच्या तीन पिढ्यात काम केलेले लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतले प्यारेलाल यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी एका ठिकाणी म्हटलंय “आताच्या संगीताबद्दल मी काय बोलावं ?हल्लीच फार वाईट पूर्वीच खूप चांगलं असं म्हणायची पद्धत आहे.पण एक सांगतो आज जे चाललंय ते फार काळ टिकू शकणार नाही.उत्तम संगीतकार आज स्वस्थ बसलेत.आज जी दिसताहेत ती दोन दिवसांची पाहुणी मंडळी आहेत.”

चित्रपट निर्मिती हा एक व्यवसाय आहे. मनोरंजन जीवनात आवश्यक असते.काही काळ निखळ रंजक चित्रपट निर्मिती झाली. त्याच बरोबर त्या त्या काळातील सामाजिक परिस्थिती नुसार,समस्यावर प्रकाश टाकून उपाय शोधायचा प्रयत्न केला गेला. त्याचा फायदा झाला.नवनवीन विषय घेऊन बदल होत गेले. खरं म्हणजे बदल हाच जीवनाचा स्थायीभाव आहे!चित्रपट सृष्टी व संगीत सुध्दा त्याला अपवाद होऊ शकत नाहीत.

बहुतेक सर्वच सिनेमांचा शेवट गोड असतो. त्यात सुद्धा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असावा असा संदेश दिलेला असतो.सिनेमा आणि सिनेसंगीतात होणारे बदल लोकांनी, समाजानी स्वीकारले.शेवटी प्रत्येकाची आवड, जीवन जगण्याची पद्धत ज्याची त्यानं ठरवायची असते.
आजच्या काळात माहिती व तंत्रज्ञान वापरून हा खटाटोप कुणीही करू शकला असता.कुणालाही शक्य असलं तरीही एवढे सगळे शक्य तितक्या सूत्रबद्ध रीतीने मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.जुनं व नवं यांची तुलना नाही. जुनं ते सगळंच सोनं नव्हे आणि नवं ते सगळं निंद्य नव्हे हे लक्षात ठेवावे.तरुण पिढीने हा खजिना, त्यातील रत्नांच्या कारकिर्दीचा ठेवा जपून ठेवावा ही इच्छा. इथं ही लेखमाला सम्पवतो.
(समाप्त)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.