Corona Update : सीरमने मागितली कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी

एमपीसी न्यूज :  फायझर नंतर आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India, SII) कोरोना लसीच्या आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यावर परवानगी मागितली आहे. यामुळे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लसीच्या वापराची अधिकृतता मिळवणारी पहिली भारतीय कंपनी असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीरमने ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (Drugs Controller General of India, DCGI) त्यांच्या कोरोना लसीच्या म्हणजेच ‘कोविशिल्ड’ च्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.  

सीरम ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाद्वारे विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ या लसीचं भारतात ट्रायल आणि उत्पादन करत आहे. यामुळे आपत्कालीन वापरासाठी लसीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी करत त्यांनी जनतेच्या हिताचा हवाला दिला आहे. याने कोरोनाचा धोका टाळण्यास आणखी मदत होईल असं सीरमने म्हटलं आहे. त्यामुळे यावर आता काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

गंभीर रूग्णांसाठी प्रभावी आहे लस

लक्षणं असणारे रुग्ण आणि कोरोनाचा गंभीर धोका असणाऱ्या रुग्णांवर कोविशिल्ड ही अत्यंत प्रभावी आहे असं सीरमने सादर केलेल्या क्लिनिकल ट्रायल्सच्या चार रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. खरंतर, एक दिवस आधीच अमेरिकन औषधनिर्मिती कंपनी फायझरने देशात लसची आयात आणि वितरण करण्याची परवानगी मिळावी आणि आपत्कालीन वापरास परवानगी द्यावी अशी मागणी भारतीय औषध नियामकांना केली आहे.

सीआयआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविशिल्ड लस चाचणीमध्ये 90 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे लवकरच ती प्रत्येकासाठी उपलब्ध होईल. यासाठी अ‍ॅस्ट्रॅजेनेकाबरोबर 10 कोटी डोसच्या करारावर सह्या झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. यामुळे कोविशिल्डचे तब्बल 100 दशलक्ष डोस हे जानेवारीपर्यंत तर शेकडो दशलक्ष डोस फेब्रुवारीच्या अखेरीस तयार करता येतील अशी माहिती पुनावाला यांनी दिली होती.

‘भारतात लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवाणगी द्या’

अमेरिकन कंपनी फायझरनेदेखील (Pfizer Corona Vaccine) भारताकडे कोरोना लसीचा तातडीने वापर करण्याची परवानगी मागितली आहे. भारताआधी युकेमध्ये या लसीला मंजूर देण्यात आली आहे. या आठवड्यापासून तिथल्या लोकांना फायझरची कोरोना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे भारतातही याला परवाणगी मिळावी अशी मागणी कंपनीने केली आहे.

औषधांची निर्मिती करणारी कंपनी फायझरने त्यांच्या भारतीय युनिटद्वारे विकसित केलेल्या कोव्हिड-19 या लसीच्या तातडीच्या वापरासाठी परवाणगी मिळावी यासाठी भारतीय औषध नियंत्रक जनरल (डीसीजीआय) कडे अर्ज केला आहे. या लसीसाठी युके आणि बहरीनमध्ये मंजूर मिळाल्यानंतर हा अर्ज करण्यात आला आहे.

आपत्कालीन मंजुरी म्हणजे काय?

आणीबाणी वापर प्राधिकरण म्हणजेच आपत्कालीन मंजुरी ही औषधं, निदान चाचण्या किंवा वैद्यकीय उपकरणांसाठीसुद्धा घेतली जाते. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन ही आपत्कालीन मंजुरीसाठी नियामक आहे. लसी आणि औषधाचा वापर अनेक चाचण्या आणि निकालानंतर मंजूर केला जातो. पण कोरोनासारखा जीवघेणा संसर्ग किंवा इतर साथीचा रोग असल्याच यासाठी लसीच्या वापरावर जोख स्वीकारत आपत्कालीन मंजुरी दिली जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.