Indian Navy : नौदलाचे हवाई सामर्थ्य

एमपीसी न्यूज- (डॉ. शैलेश देशपांडे) 1. ‘I feel the need, the need for speed’ असं म्हणणाऱ्या Maverick मुळे नौदलातील (Indian Navy) लढाऊ विमानांची उत्सुकता वाटणे सहाजिकच आहे. जेव्हा समान क्षमतेच्या विमानांना हजारो फुटांच्या धावपट्टी गरजेची असते, तेव्हा ही विमाने अवघ्या दोनशे फुटांमध्ये कशी उड्डाण भारतात अणि लँडही होतात, ही आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. अथांग समुद्रात तरंगणाऱ्या विमानवाहू नौकेवर ही विमाने कशी राखली अणि सांभाळली जातात? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जवळ जवळ 120 वर्षांच्या इतिहासात लपली आहेत.

2. मनुष्याचे उड्डाण हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सर्वोच्च शोधांपैकी एक मानले जाते. चपळता, आवाजापेक्षा दुप्पट ते (Indian Navy) तिप्पट वेग, गुरुत्वाकर्षणाच्या आठपट जोराखाली कार्य करण्याचे बळ अशा इत्यादी क्षमतांमुळे लढाऊ विमानांची आधुनिक तंत्रज्ञानातील श्रेष्ठता फक्त अंतराळशास्त्राला दुय्यम मानता येईल. अशा विमानांना अवघ्या 200 फुटी जहाजावरून उडवण्यासाठी त्यांच्या अंतर्गत प्रणालीमध्ये अनेक बदल करावे लागतात. जड लँडिंग भार सहन करण्यासाठी लँडिंग गियर, इंधन आणि हायड्रॉलिक पाइपलाइन्स, शस्त्र अणि इतर संलग्न उपकरणांचा जोड इ. घटक मजबूत करणे अनिवार्य ठरते.

या मजबुतीकरणाने वाढलेल्या विमानाच्या वजनाला पेलण्यासाठी अधिक शक्तिशाली इंजिन्स आणि लिफ्ट ऑगमेंटेशन उपकरणांची गरज पडते. याशिवाय विमानाला जहाजावरून लॉन्च आणि रिकव्हर करण्यासाठी अरेस्टर हूक, रिस्ट्रेनिंग ब्लोक्स किंवा कॅटपल्ट टो-बार या उपकरणांचाही समावेश करावा लागतो. आजपर्यंतच्या उदाहरणांचे विश्लेषण करता, असे समजते की एका जमिनीवरून उडणाऱ्या विमानाला सुधार करून जहाजावरून उडवण्यापेक्षा सुरवातीपासून एका युद्धनौका आधारित लढाऊ विमानाची संकल्पना विकसित केली असल्यास उत्तम यश अणि कमीत कमी अडचणी येतात.

3. इतिहास सन 1905 चे राइट बंधूंचे उड्डाण हे माणसाचे पाहिले स्वयंचलित उड्डाण होते हे बहुतेक लोकांना माहिती असेलच पण ग्लेन कर्टिस या समकालीन शास्त्रज्ञाचे विमानशास्त्रातील काम फार क्वचित ठाऊक आहे. राइट बंधूंनी त्यांच्या विमानाला वळण्यासाठी ‘बॅंकिंग’ या पद्धतीचा वापर केला होता. या पद्धतीत विमानाच्या पंखांना पिळा देऊन दिशा बदलली जाते. भौतिक थकवा अणि नैसर्गिकरित्या अपारंपरिक असल्याने बॅंकिंगपेक्षा ग्लेन कर्टिसच्या ऐलेरोनचा वापर करणे जास्त प्रभावी ठरते. जगातील पहिले जहाजावरील उड्डाण हे याच शासत्रज्ञाने अमेरिकी नौदलाच्या मदतीने साकारले.

ही फार नवलाची वस्तुस्थिती आहे की, विमानांचा वापर लष्करी उद्देशाने करण्याची कल्पना पहिल्यांदा एका नौदलाने साकारलेली आहे. परंतु उडवलेल्या विमानाला परत सुखरूप जहाजावर लँड करण्याच्या अशक्यतेने लढाऊ विमानांना पाहिल्या विश्वयुद्धात सागरी डावपेचांपासून दूर ठेवले. दुसर्‍या विश्वयुद्धापर्यंत मात्र विमानवाहू नौका विकसित केल्या गेल्या. जपान, अमेरिका अणि ब्रिटन या देशांनी जहाजाच्या फ्लाइट डेकवर अरेस्टर केबल्सचा वापर करून विमान पुनर्प्राप्त करण्याचे तंत्र विकसित केले. जपानचा प्रसिद्ध पर्ल हार्बरचा हल्ला, मिडवे बेटाची लढाई अणि एकंदरीत प्रशांत महासागरातील युद्धाने विमानवाहू जहाज आणि नौदलातील लढाऊ विमानांचा पराक्रम आणि त्यांचे सामर्थ्य सिद्ध केले. दुसर्‍या विश्वयुद्धात मिळालेल्या यशामुळे अमेरिकेने भविष्यातील सर्व सागरी रणनीती विमानवाहू जहाजांभोवती केंद्रित केल्या.

4. जेट विमान 14 ऑक्टोबर 1947 रोजी अमेरिकी वायूदलाच्या कॅप्टन चक येगर यांनी अधिकृतपणे आवाजाहून जास्त वेगाने उडवून विक्रम केला. परंतु अंतर्गत ज्वलन इंजिन आणि प्रोपेलरने चालणारी विमाने अशी उच्चगती प्राप्त करण्यास आणि टिकवून ठेवण्यास स्वाभाविकपणे अक्षम होती. त्याच वेळी नाझी जर्मनीने विकसित केलेले जेट इंजिन विज्ञान अमेरिकी शास्त्रज्ञांच्या हाती आले. हे इंजिन प्रचंड शक्ती प्रदान करण्यास आणि उच्च गती प्राप्त करण्यास अत्यंत सक्षम होते. अशा उत्कृष्ट शक्ती देणार्‍या इंजिनाच्या विशिष्ट मर्यादा म्हणजे भारी वजन आणि अधिक इंधनाची गरज. वाढलेली इंधनाची गरज विमानाचे वजन अधिकच वढवते. विमानाचे वजन आणि धावपट्टीची आवश्यक लांबी थेट प्रमाणात असते, याचे सर्वसामान्य उदाहरण म्हणजे लहान ग्लायडर विमाने काही शंभर मीटरमध्येच उडू शकतात पण मोठ्या जंबोजेट्सला मात्र लांबलचक धावपट्टी अनिवार्य आहे. वजन आणि धावपट्टीच्या मर्यादेमूळे ही जलद आणि सक्षम विमाने युद्धनौकेवरून लाँच करणे अशक्यच होते. या मर्यादा पार करून जेट विमाने जहाजावरून लाँच करण्यासाठी तीन प्रमुख प्रणालींचा वापर केला जातो.


5. Catapult Launched Barrier Arrested Recovery (CATOBAR). विमानवाहू जहाजावरून जेट पॉवरवर चालणारी विमाने प्रक्षेपित करण्याच्या गरजेने कॅटपल्ट प्रक्षेपण प्रणालीला जन्म दिला. या प्रणालीमध्ये उच्च दाबाखाली साठवलेल्या वाफेचा वापर करून 10 ते 12 टनच्या विमानांना 100 मीटरपेक्षाही कमी धावपट्टीमध्ये 200 किमी प्रति तासाचा प्रचंड वेग दिला जातो. आजपर्यंत ही प्रणाली सर्वात प्रभावी ठरली आहे.

या प्रणालीच्या अवाढव्य क्षमतेमुळे लढाऊ विमाने अधिक शस्त्रे व दारुगोळा घेऊन उड्डाण भरू शकतात. काळानुसार झालेल्या प्रगतीमुळे आज कॅटपल्ट जड सामानवाहू आणि AWACS विमानांनाही जहाजावरून लाँच करू शकते. अणूऊर्जित जहाजांवर भरपूर वाफेची ऊर्जा उपलब्ध असल्याने कॅटपल्ट आणि अरेस्टर वायर प्रणाली अगदी सहज वापरता येते. अमेरिका आणि फ्रान्स हे दोन देश CATOBAR नौकांचा वापर करतात. भारतानेही या प्रणालीचा 1961 ते 1979 मध्ये उत्तम वापर केलेला आहे.

 


6. Short Take- off Barrier Arrested Recovery (STOBAR). कॅटपल्ट आणि अरेस्टर वायर प्रणाली शक्तिशाली असूनही पारंपारिक जहाजे त्यांना लागणारी प्रचंड वाफ उपलब्ध करण्यात अकार्यक्षम ठरतात. शिवाय या प्रणाली वापरणे आणि त्यांना जपणे हे फार खर्चिक ठरते. अशा पारंपारिक व लहान विमानवाहू नौकांवरून विमाने लाँच करण्यासाठी आधुनिक आणि अधिक शक्तिशाली जेट इंजिनाचा प्रयोग केला जातो.

जहाजाच्या फ्लाईट डेकवर रिस्ट्रेनिंग ब्लॉकच्या मदतीने विमानाला धरून ठेवले जाते. जेटची पूर्ण शक्ती उपलब्ध झाल्यावर अचानक हे ब्लॉक काढले जातात आणि विमान आवश्यक गती प्राप्त करून उड्डाण भरते. भारतीय नौदलाचे MiG-29K हे अशा प्रकारे वापरले जाणारे विमान आहे. भारताशिवाय रशिया आणि चीन याच प्रणालीचा वापर करतात. रिस्ट्रेनिंग ब्लॉकसह स्की – जंपचाही विमानाला प्रारंभिक लिफ्ट प्रदान करण्यात मोठा वाटा आहे.

किंबहुना हे स्की – जंप STOBAR नौकांचे लक्षणीय वैशिष्ट्य ठरते. कोणतेही हलते घटक नसल्याने संपूर्ण प्रणालीची देखभाल फार खर्चिक नसते. परंतु कोणतेही बाह्य-सहाय्य नसल्याने विमानाची शस्त्र वाहून नेण्याची क्षमता मर्यादित होते. या अडचणीचा एक उपाय म्हणून विमानाला आंशिक इंधनासह उडवले जाते व त्यानंतर हवेत एयर – टू – एयर रिफ्युएलिंगच्या माध्यमातून इंधन पुरवले जाते. या मर्यादांमुळे जहाज व विमानांची कार्यरत क्षमतेशी तडजोड करावी लागते. या प्रणालीचा वापर करून उड्डाण भरण्यासाठी विमानात दोन प्रचंड शक्तिशाली इंजिन असणे अनिवार्य आहे.

7. Short Take – Off Vertical Landing (STOVL). अत्यंत लहान विमानवाहू जहाजांवरून लढाऊ विमाने उडवण्यासाठी विमानाच्या एक्झॉस्टमध्ये संरचनात्मक बदल करून त्याला हेलिकॉप्टर समान हवेत स्थिर तरंगण्यासाठी सक्षम केले जाते. या बदलामुळे विमानाला लाँच करतानाही अधिक वेगाची गरज पडत नाही आणि स्की – जंपच्या सहाय्याने उड्डाण भरणे अगदी सोपे ठरते. इंजिनच्या जोराचा अक्ष बदलल्याने अशा विमानामध्ये एकापेक्षा जास्त इंजिन लावता येत नाहीत. संरचनात्मक बदल आणि एकाच इंजिनची मर्यादा यामुळे शस्त्र व दारुगोळा वाहण्याची क्षमता फारच कमी होते. यामुळे ही विमाने भारी मोहिमा (उदा. स्ट्राइक) साकार करण्यासाठी अक्षम ठरतात. इंग्लंड व जपान हे STOVL युद्धनौकांचा वापर करणारे देश आहेत.


अपेक्षित भविष्य

8. Electro-Magnetic Aircraft Launching System (EMALS). EMALS ही CATOBAR प्रणालीतील आधुनिक प्रगती आहे. उच्च दाबाखाली साठवलेल्या बाष्प ऊर्जेशिवाय प्रचंड विद्युत ऊर्जेचा वापर करून विमानाला लाँच केले जाते. वाफ निर्मितीच्या अनुपस्थितिमध्ये या प्रणालीची कार्यरत क्षमता अधिकच वाढते. ही प्रणाली पूर्णपणे सिद्ध झालेली नसल्यामुळे ती अद्याप विकसीत केली जात आहे. अमेरिका आणि चीन हे देश आपापल्या नवीनतम विमानवाहू जहाजांवर या प्रणालीचा वापर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

9. 6th Generation Aircraft. लढाऊ विमान तंत्रज्ञानातील प्रगती पिढ्यांद्वारे परिभाषित केली जाते. आजच्या काळात तिस-या ते पाचव्या पिढीतील विमानांचा वापर केला जातो आणि सहावी पिढी विकसीत केली जात आहे. (उदा. भारतीय वायुसेनेचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी वापरलेले MiG 21 विमान तिसऱ्या पिढीचे आहे आणि भारताचे नवीनतम संपादन केलेले राफेल विमान हे चौथ्या आणि पाचव्या पिढ्यांच्या मधील विमान आहे.) सहाव्या पिढीतील सर्वात मोठा फरक करणारा घटक म्हणजे मानवरहित विमाने आणि त्यांचे नियंत्रण. या तंत्रज्ञानामुळे लढाईसाठी तीन ते चार मानवरहित विमानांचे नियंत्रण एकामानवयुक्त विमानातून करून अत्यंत अवघड मोहिमा हाती घेतल्या जाऊ शकतात. भारताचे Combat Air Teaming System (CATS) हे या तंत्रज्ञानाचे उदाहरण आहे. (भारत अद्याप कोणतेही सहाव्या पिढीचे लढाऊ विमान विकसीत करत नाहीय) या तंत्रज्ञानाचा वापर करून मानवरहित विमानांचा उपयोग नौदलासाठी पाळत ठेवणे, स्ट्राइक व इतर लढाऊ विमानांना सहाय्य करण्यासाठी केला जाण्याचा प्रयत्न चालू आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता आणि उच्च क्षमतेच्या संगणकाचा वापर करून या क्षेत्रात प्रगती केली जात आहे.

10. भारतीय नौसेनेचे लढाऊ हवाईदल. 05 सप्टेंबर 1961 रोजी भारतीय नौसेनेने आपले पहिले लढाऊ विमानांचे स्क्वाड्रन तयार केले. भा.नौ.पो. विक्रांत (1961-1971) ह्या पहिल्या विमानवाहू जहाजावरून सी-हॉक आणि अलिजे सारख्या सक्षम विमानांचा वापर करून नौसेनेच्या लढाऊ वैमानिकांनी 1971 च्या लढाईत पूर्व पाकिस्तान वर संपूर्ण हवाई वर्चस्व स्थापित केले होते. या युद्धातील चिटगांग व कॉक्स बाजारच्या नौसेनेच्या मोहिमा प्रसिद्ध आहेत. विक्रांतच्या दुरुस्तीबरोबर नौसेनेने CATOBAR मधून VSTOLप्रणालीमध्ये स्थलांतर केले. याच बरोबर भारताने आपले दुसरे विमानवाहू जहाज भा.नौ.पो. विराट कमिशन केले. दोन्ही जहाजांवरून उडवण्यासाठी सी हैरियर या VSTOL विमानाला विकत घेण्यात आले.

हे विमान रडार व क्षेपणास्त्रांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याने नौदलाच्या लढाऊ रणनीतीत क्रांती घडवून आणण्यास चालना मिळाली. 2014 मध्ये अनेक प्रयत्नानंतर भारताने तिसरे विमानवाहू जहाज, भा.नौ.पो. विक्रमादित्य घेतले. हे 45,000 टन वजनाचे जहाज पहिल्या दोन जहाजांपेक्षा दुप्पट क्षमतेचे असून याबरोबर आलेले MiG-29K विमान हे नौसेनेचे पहिले सुपरसोनिक विमान आहे. या विमानाचा वेग आवाजापेक्षा दुप्पट असून हे विमान एअर- टू- एअर (दूस-या विमानांविरुद्ध) आणि एअर- टू- ग्राउंड/ सरफेस (हवेतून जमिनीवर किंवा युद्धनौकांवर हल्ला करणे) या दोन्ही प्रकारच्या ऑपरेशन्ससाठी कार्यक्षम आहे. याचबरोबर भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी विमान ‘तेजस’ ला विक्रमादित्यवर रिकव्हर व लाँच करून नेव्हल एयरक्राफ्ट डिझाइनचे किचकट शास्त्र अवगत करून घेतले आहे .

या पराक्रमी कृत्याच्या बळावर नौसेना, एरोनोटीकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA), हिंदुस्थान एरोनोटीकल्स लिमिटेड (HAL) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मिळून स्वदेशी व अत्याधुनिक लढाऊ विमान विकसीत करत आहेत. ह्या प्रकल्पाचे नाव Twin Engine Deck Based Fighter (TEDBF) असून याचे पहिले उड्डाण 2026 मध्ये करण्याचे ठरले आहे. 2030 पर्यंत सिद्ध होऊन हे विमान भारतीय नौसेनेत कार्यान्वित होईल, अशी अशा आहे. फाइटर एव्हिएशनच्या सतत वाढत्या प्रवासात खंड येऊ नये म्हणून येत्या दशकात TEDBF कार्यान्वित होईपर्यंत अंतरिम उपाय म्हणून भारताचा F/A 18 ‘सुपर होर्नेट’ किंवा राफेल – एम् या विमानांची खरेदी करण्याचा मानस आहे. ही दोन्ही विमाने अत्यंत सक्षम असून त्यांच्या वापरातून नौसेनेला पुढील वाटचालीसाठी नक्कीच
मदत होणार आहे .

02 सप्टेंबर 2022 रोजी पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजाला कमिशन करून भारताने इतिहास रचला आहे. विमानाचे डिझाइन व जहाज बांधणीचे तंत्र एकत्रितपणे विकसीत केल्यास एकंदरीत कार्यरत क्षमता वाढवण्यात मदत मिळणे अपेक्षित आहे. या सर्व क्षमतांच्या आधारावर नौसेना 2030 पर्यंत दुसरी स्वदेशी विमानवाहू युद्धनौका विकसित करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आखत आहे.

11. कोणत्याही देशाच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यासाठी विमानवाहू जहाज नेहमीच एक प्रभावी व्यासपीठ राहिले आहे. भारतीय नौदलाने प्राणघातक लढाऊ वायुसेना विकसित करणे हा प्रादेशिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न नसून देशाचे हेतू सिद्ध करण्यासाठीची गरज आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताच्या वाढत्या महत्त्वामुळे आपली मुत्सद्देगिरी आवश्‍यक ठरत आहे. भारताच्या समुद्रातील जागतिक व्यापार आणि आर्थिक भागीदारीच्या प्रमाणासह, एका शक्तिशाली नौदलाची लढाऊ वायुसेना हा आपल्या कार्यक्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा एकमेव मार्ग आहे. ‘मुत्सद्दीपणासाठी वर्चस्व अनिवार्य असते’ ही वस्तुस्थिती ह्या लढाऊ विमानांना व प्रचंड युद्धनौकांना 45,000 टन ऑफ डिप्लोमसी सिद्ध करते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.