Indian Post Parcel Service: टपाल विभागाची रेल्वे पार्सल सेवा आता सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि अकोल्यातही

Indian Post Parcel Service: Postal Department's Railway Parcel Service is now available in Solapur, Kolhapur, Nashik and Akola वस्तू किंवा पार्सल पाठविण्यासाठी आता ग्राहकांना टपाल कार्यालयात वस्तू घेऊन जाण्याची आवश्यकता नाही.

एमपीसी न्यूज- मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र पोस्टल सर्कल यांच्या संयुक्तपणे सुरु करण्यात आलेल्या भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. सुरुवातीला ही सेवा केवळ मुंबई, पुणे आणि नागपूर एवढीच होती. मात्र, तिचा विस्तार करून ही सेवा सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि अकोला शहरात देखील सुरु करण्यात आली आहे.

कोविड-19 च्या सद्यस्थितीत, व्यक्ती आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांना त्यांच्या मोठ्या आकाराच्या आवश्यक आणि इतर वस्तूंची वाहतूक करणे कठीण जात आहे.

बऱ्याच लोकांकडून पार्सल पाठविण्यासाठी स्पीड पोस्टची सेवा मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. तथापि, ग्राहकांना जास्त वजनाच्या स्लॅबमध्ये असलेल्या वस्तू बुकिंगसाठी पोस्ट ऑफिसमध्ये नेणे अवघड जात आहे.

कोरोना काळात रेल्वेच्या विशेष पार्सल गाड्या सुरु आहेत. त्यामुळे भारतीय टपाल सेवा आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने 15 मे पासून मुंबई, पुणे आणि नागपूर रेल्वे स्थानकांदरम्यान भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा सुरु करण्यात आली आहे. तिचा विस्तार आणखी चार जिल्ह्यात करण्यात आला आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला या शहरातील ग्राहकांच्या घरून भारतीय टपाल विभाग वस्तू, पार्सल घेणार. वस्तू किंवा पार्सल पाठविण्यासाठी आता ग्राहकांना टपाल कार्यालयात वस्तू घेऊन जाण्याची आवश्यकता नाही.

भारतीय टपाल सेवा ग्राहकांच्या घरून वस्तू, पार्सल घेऊन रेल्वेच्या विशेष पार्सल गाड्यातून संबधित शहरात पोहोचवणार. तिथून पुन्हा टपाल सेवा रेल्वे स्थानकावरून वस्तू, पार्सल घेणार आणि ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवणार.

ही सेवा ग्राहकांना किफायतशीर दराने आणि डोअर-टू-डोअर वाहतुकीच्या सेवा सुविधेसह उपलब्ध करून दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी 9324656108 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच ग्राहक [email protected] या मेल आयडीवर ईमेल करू शकतील, अशी माहिती रेल्वे विभाग आणि टपाल विभागाकडून देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.