Asia Cup 2022 – आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सुरुवात

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आशिया कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सर्वाधिक सात वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला पाच गडी राखून नमवत आपला विजयी श्रीगणेशा केला.हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी आणि भुवनेश्वरची अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला.

खेळपट्टी गोलंदाजाला सुरुवातीला साथ देईल असा अदांज सामन्याआधी व्यक्त केला जात होता, त्यातच रोहीत शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्याचा एकच गडगडाट करून त्याच्या निर्णयाचे समर्थन केले. भारतीय संघासाठी स्वप्नवत सुरुवात झाली, पहिल्याच षटकात दोन वेळा अपील केले गेले जे फेटाळले गेल्यावर डीआरएस ही घेतले गेले, तेसुद्धा भारतीय संघाच्या विरोधात गेले,मात्र भुवनेश्वर कुमारनेच भारतीय संघाला पहिले यश मिळवून देताना जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या बाबर आझमला बाद केले. त्याने फक्त 10 च धावा केल्या, आणि त्यानंतर थोड्याच वेळात आवेश खानने फक्त जमानला बाद करुन भारताला दुसरे यश मिळवून दिले.यावेळी पाकिस्तानच्या धावसंख्या दोन बाद 42 अशी होती, यानंतर मात्र मोहम्मद रिझवान आणि इफ्तीकार अहमद यांनी तिसऱ्या गड्यासाठी  45 धावांची छोटी पण महत्वपूर्ण भागीदारी करून संघाचा डाव सावरला. पण हार्दिक पांड्याने अहमदला बाद करुन ही जोडी फोडली आणि त्यानंतर लगेचच जम बसलेल्या रिझवानलाही 43 धावांवर बाद करुन पाकला मोठा धक्का दिला आणि याच षटकात  खुशदिललाही बाद करुन पाकचा अर्धा संघ तंबूत पाठवला. यानंतर मात्र पाकसंघाचे फलंदाज फारसे काही करु न शकल्याने त्यांचा डाव केवळ 147 धावातच गारद झाला. तळाच्या दाहनीने वेगवान धावा जमवून  संघाला किमान लढण्यायोग्य धावसंख्या गाठून दिली. भारतीय संघाकडून भुवनेश्वरने सर्वाधिक 4 तर पंड्याने 3 गडी बाद केले. युवा अर्शदिपनेही दोन गडी बाद करुन त्यांना चांगली साथ दिली.

भारतीय संघाची मजबूत फलंदाजी बघता 148 धावांचे लक्ष्य फारसे अवघड नव्हते, पण पाकिस्तान संघाची वीजिगिशु वृत्ती आणि जबरदस्त स्विंग गोलंदाजी बघता हा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा होतीच ,त्यातच 19 वर्षीय आणि आपला पहिलाच टी-20 सामना खेळणाऱ्या नसीम शहाने जबरदस्त षटक टाकत आपल्या पहिल्याच षटकात के एल राहुलला साफ चकवत त्रिफळाबाद केले, आणि याच षटकात आपला 100 वा सामना खेळणाऱ्या विराटलाही परेशान केले, केवळ नशिबाने साथ दिल्याने विराट वाचला,यानंतर मात्र रोहीत आणि विराटने दुसऱ्या गड्यासाठी 49 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत डाव सावरला,मात्र 12 धावावर असताना नवाजने कर्णधार रोहितला बाद करुन आपल्या संघाला दुसरे यश मिळवून दिले. आणि त्यानंतर लगेचच विराटलाही बाद करत भारतीय संघाची अवस्था 3 बाद 53 अशी केली, आपल्या 100 व्या सामन्यात  कोहलीने 34 चेंडूत 35 धावा केल्या, यानंतर मात्र रवींद्र जडेजा आणि सुर्यकुमार यादव या जोडीने  चौथ्या गड्यासाठी 36 धावांची छोटी पण महत्वपूर्ण भागीदारी करुन डाव सावरला,यादव चांगले खेळत आहे असे वाटत असतानाच  नसीम शहाने त्यालाही त्रिफळाबाद करून सामन्यात रंगत निर्माण केली,कारण यानंतरही भारतीय संघाला 34 चेंडूत 59 धावा हव्या होत्या,पण अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि जडेजाने जबरदस्त फलंदाजी करत आपापल्या जबाबदारीला सार्थ निभावत संघाला विजयासमीप आणून सोडले, ही जोडीच विजय मिळवून देईल असे वाटत असतानाच जडेजा नवाजच्या गोलंदाजीवर 35 धावांवर त्रिफळाचीत झाला,त्याने 29 चेंडूत 2 चौकार आणि तितकेच षटकार मारत 35 धावा केल्या,मात्र आधी गोलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या पंड्याने केवळ 17 चेंडूत चार चौकार आणि एक उत्तुंग षटकार मारत नाबाद 33 धावा करत संघाला पाच गडी आणि दोन चेंडू राखुन विजयी केले,अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या पंड्याला सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान सर्वबाद 147

रिझवान 43,बाबर 10,अहमद 28,दाहनी 16

भुवनेश्वर 26/4,पंड्या 25/3,अर्षदीप 33/2,आवेश खान 19/1

पराभूत विरुद्ध भारत

19.4 षटकात 5 बाद 148

कोहली 35,जडेजा 35,पंड्या नाबाद 33

नसीम शाह 27/2,नवाज 33/3

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.