Pune News : रोजगार वाचवण्याची भारतीय मजदूर संघाची मागणी

कोरोना महामारीमध्ये 2 कोटी कामगारांचा रोजगार गेल्यामुळे कामगारांसमोर उपजिविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीच्या काळात रोजगार वाचवण्याची मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे.  याबाबतचे निवेदन भारतीय मजदूर संघाने पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिले आहे.

यावेळी भारतीय मजदूरच्या वतीने अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे सरचिटणीस उमेश विस्वाद, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी सचिन मेंगाळे, भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा पदाधिकारी अर्जुन चव्हाण, अभय वर्तक, अजेंद्र जोशी आदी उपस्थित होते.

कोरोना महामारीमध्ये 2 कोटी कामगारांचा रोजगार गेल्यामुळे कामगारांसमोर उपजिविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार निर्मिती करिता विशेष अभियान, मायग्रंट वर्कर्सची नोंदणी, बिडी कामगारांना किमान वेतन, स्वतःचे घर, सर्व कामगारांना मोफत आरोग्य व शिक्षण सुविधा, वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना रोजगारात स्थैर्य, रोजगाराचे रक्षण, स्थाई रोजगार, बेरोजगार भत्ता, कोरोना काळातील संपुर्ण वेतन व नोकरीची हमी, ईएसआय योजनेमार्फत ‘कॅशलेस मेडिक्लेम’ असे लाभ मिळावेत याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिले आहे.

मायग्रंट वर्कर्सची नोंदणी नोडल एजन्सीमार्फत लवकरच चालू करण्यात येईल व उपजिविका रक्षणासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी देशमुख यांनी यावेळी दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.