Pune : भारताचे संविधान आपल्याला लढण्यासाठी बळ देते : ऍड. असीम सरोदे

एमपीसी न्यूज – ‘भारताचे संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते. त्याचप्रमाणे आपल्याला लढण्यासाठी बळ देते. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्तीला प्रेम करण्याचा अधिकार देखील आहे. भारतीय संविधान माणसाला जगण्यासाठी प्रेरणा देते, असे वैचारिक सोहळ्याचे प्रमुख वक्ते अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.

संस्कार मंदिर संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय वारजे माळवाडी पुणे व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत अर्ध दिवसीय शिबिराचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. भारताचे संविधान अर्थात भारतीय राज्यघटनेचा जागर याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी भारताच्या संविधानाची प्रत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले.

भारताची राज्यघटना आपल्या सर्वांना शिक्षण, आरोग्य, ज्ञान, संपत्ती आदी गोष्टी मिळवण्याचा अधिकार देते. संविधान आपल्याला श्रद्धा उपासना पद्धती यांचे पालन करण्याचा अधिकार देते, असेही सरोदे म्हणाले.

अॅड. परिक्रमा खोत म्हणाल्या, ‘संविधान’ हे भारतीयांना समान हक्क देते, धर्म धारण करण्याचा अधिकार देते, मतदानाचा अधिकार देते. संविधानामुळेच सामान्य वर्गातील नागरिक निवडणुकींना सामोरे जाऊन सर्वोच्च स्थानी विराजमान होऊ शकतात, ही संविधानाची ताकद आहे.

‘संविधान’ हे सर्व भारतीयांचा विश्वास बनले पाहिजेत. जात, धर्म, पंथ व प्रांत यापेक्षा राष्ट्राला आपण महत्त्व द्यावे, असे आवाहन पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. दिलीप भोईटे अध्यक्षस्थानी होते. डॉ. स्वप्नील गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. प्रा. धनंजय त्रिमुखे यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय डॉक्टर देवेंद्र भावे यांनी करून दिला तर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन डाॅ. राजेंद्र थोरात आणि डॉ. कविता मुनेश्वर यांनी केले. गौरी शिंदे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.