Pune : देशात पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपणातून चिमुकलीचा जन्म

एमपीसी न्यूज – गर्भाशय प्रत्यारोपणानंतर पहिल्यांदाच एका महिलेची प्रसूती झाल्याची ऐतिहासिक घटना गुरुवारी पहाटे पुण्यात घडली. गर्भाशय प्रत्यारोपणानंतर देशात पहिल्यांदाच एका महिलेने गोंडस चिमुकलीला जन्म दिला. डॉ. शैलेश पुणतांबेकर आणि त्यांच्या टीमने गॅलक्सी केअर रुग्णालयात ही ऐतिहासिक प्रसूती केली. पहाटे १२ वाजून १२ मिनिटांनी सिझेरियन प्रसुती झाली. बाळाचे वजन 1450 ग्रॅम आहे. भारताच्या वैद्यकीय क्षेत्रात हा इतिहास घडला आहे.

देशातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यातील गॅलॅक्‍सी केअर रुग्णालयात १८ मे २०१७ रोजी करण्यात आले. गुजरातमधील वडोदरा येथे राहणाऱ्या संबंधित महिलेला तिच्या ५२ वर्षीय आईने गर्भाशय दान केले. पुण्यातील गॅलेक्सी लॅप्रोस्कोपिक इन्स्टिट्यूटचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या पथकाने हे प्रत्यारोपण पार पाडले. त्यानंतर गेले सात महिन्यांपासून या महिलेवर गॅलेक्सी केअर रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते.

प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयातून जन्म घेणारे हे देशातील पहिले बाळ ठरले आहे. जगभरामध्ये आतापर्यंत प्रत्यारोपित गर्भाशयातून ११ बाळांचा जन्म झाला आहे. त्यामुळे या पद्धतीने जगात येणारे हे १२ वे बाळ आहे.

दरम्यान, गर्भवती महिलेचा रक्तदाब वाढल्याने आम्हाला सिझेरियन करून प्रसूती करावी लागली. या प्रसूतीसाठी लॅप्रोस्कोपी पद्धतीचा वापर करण्यात आला. मुलीचं वजन १.४५० किलोग्रॅम आहे आणि आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. प्रत्यारोपण केलेल्या गर्भाशयातून मुलीचा जन्म झाल्याने आम्हाला खूप आनंद होतो आहे.’ असे डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.