Pune News : नऱ्हेत घातक हत्याराचा धाक दाखवून देशी दारूचे दुकान लुटले

एमपीसी न्यूज : मॅनेजरला घातक हत्याराचा धाक दाखवून पाच जणांच्या टोळीने नऱ्हे येथील एका देशी दारूच्या दुकानातील रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश दौलतराव पाटील (वय 50) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नऱ्हे येथील पारी कंपनी चौकाजवळ सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. 24 फेब्रुवारी च्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी पिट्या, हुक्या आणि त्याचे तीन साथीदार या दुकानात शिरले. त्यांनी मॅनेजर शिवप्रकाश अग्रणी याला पालघन सारख्या लोखंडी हत्याराने मारण्याची भीती दाखवून शिवीगाळ केली. त्यातील एकाने माझे नाव हुक्या आहे, गल्ल्यातील सर्व पैसे दे, नाहीतर मारून टाकीन’ अशी धमकी दिली.

त्यानंतर मॅनेजर शिवप्रकाश अग्रणी घाबरून गल्ल्यापासून दूर झाला असता अन्य एका आरोपीने गल्ल्या मध्ये हात घालून अंदाजे तीस हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.